तासगाव (जि. सांगली) : राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण मिळालं नसल्यास धनगर समाजाचा (Dhangar Reservation) उद्रेक होईल, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा समस्त धनगर समाजाच्या वतीने सांगलीमध्ये (Sangli News) देण्यात आला. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये धनगर समाजाचा भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील भिलवडी नाक्यापासून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये पारंपारिक वाद्य, शेळ्या मेंढ्यासह हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले.
मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणालाही खासदार-आमदारांनी आणि नेत्यांनी पाठिंबा द्यावा व आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घ्यावी, तसेच मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजदेखील आरक्षण मिळेपर्यंत गावागावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करणार, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. मुदतीत आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी सांगली जिल्हा धनगर महासंघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला.
सांगलीत सर्व आमदार, खासदारांचे लाक्षणिक उपोषण
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा पुढील निवडणुकीत निश्चित फटका बसेल, असा इशारा सकल मराठा समाजाकडून सांगलीत देण्यात आला. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते. याचवेळी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेत आरक्षणाच्या मुद्यावर कोंडीत पकडले. सकल मराठा समाजाकडून लोकप्रतिनिधींची भेट घेऊन भूमिका जाणून घेण्यात आली. यावेळी सर्वांनीच मराठा आरक्षणासाठी आता केवळ आश्वासन न देता त्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी येत्या चार दिवसांचा इशारा देऊन जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सर्वांनीच राजीनाम्याचा विषय टाळला. यावेळी सकल मराठा समाजाचे डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, अशोक पाटील, शंभोराज काटकर आदींनी यावेळी आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडली.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांकडून मुख्यमंत्र्यांना एकदिवसीय अधिवेशन घेण्याबाबत पत्र तसेच मराठा आरक्षण मागणीसाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण आज करण्यात येत आहे.
मनोज जरांगेंबाबतचं 'हेच' वक्तव्य आमदार प्रकाश सोळंकेंना भोवलं
दुसरीकडे, सोशल मीडियात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. यावेळी प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. याच्याच निषेधार्थ आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक केली. बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या.
इतर महत्वाच्या बातम्या