सांगली : जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल एवढंच सांगतो, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका भाषणात केलं होतं. याच भाषणाचा आधार घेत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचे एक रील बनवून ते व्हायरल करत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना डिवचलं आहे. 


विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनाच डिवचलं


सांगली लोकसभेमध्ये बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांना त्यांची जागा दाखवली, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं होतं. तसेच अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. ते देखील लवकरच बोलणार असल्याचं विश्वजीत कदम यांनी सांगितलं होतं. तसेच ज्यांनी करेक्ट कार्यक्रम करायचा प्रयत्न केला त्यांचाच करेक्ट कार्यक्रम केल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं होतं. यावर आता जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हे रील बनवत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनाच डिवचलं आहे. त्यामुळे सांगलीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये कलगीतुला रंगणार का हे देखील पहावं लागणार आहे.


आश्वासनांची वचनपूर्ती कशा पद्धतीने होईल ते बघा 


दुसरीकडे, विशाल पाटील आता खासदार म्हणून निवडून आलेत, त्यांना शुभेच्छा आहेत, पण चंद्रहार पाटील मातोश्रीवर कसा पोहोचला हे आता विशाल पाटलांनी शोधत बसण्यापेक्षा जी आश्वासने दिली आहेत, त्या आश्वासनांची वचनपूर्ती कशा पद्धतीने होईल, या दृष्टीने विशाल पाटील यांनी प्रयत्न सुरु करावा, असा टोला चंद्रहार पाटील यांनी लगावला. 


एक साधा पैलवान मातोश्रीपर्यंत कसा पोहोचतो हे विशाल पाटलांनी अनेकवेळा बोलून दाखवलं. मला साधा पैलवान म्हणण्यापेक्षा विशाल पाटील यांनी हे लक्षात ठेवावे की सांगली जिल्ह्याला मी दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी  मातोश्रीपर्यंत कसा पोहोचतो हे आता शोधत बसण्यापेक्षा तुम्ही जी जी आश्वासने निवडणुकीमध्ये जनतेला दिली आहेत, त्या आश्वासनाची वचनपूर्ती कशा पद्धतीने होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करावा असा टोला  त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या