Sangli News : डाळिंबाच्या बागेत गांजाची (Marijuana) लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली (Sangli) जिल्ह्याच्या जत तालुक्यातील माणिकनाळ गावात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी छापा टाकत 13 लाख रुपयांचा 133 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे. यामुळे जत तालुक्यात गांजा लागवडीचे प्रमाण अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. 


133 किलो 91 ग्रॅम ओला गांजा जप्त
जत तालुक्यातील माणिकनाळ इथे महासिद्ध लक्ष्मण बगली याच्या डाळिंब बागेत छापा टाकून 13 लाख 39 हजार 100 रुपयांचा 133 किलो 91 ग्रॅम ओला गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे. महासिद्ध बगली हा कुटुंबासमवेत गावात राहतो. डाळिंबाच्या शेतात त्याने गांजाची लागवड केल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक पंकज पवार यांनी बुधवारी (3 ऑगस्ट) बगली याच्या शेतात छापा टाकला. त्याच्या डाळिंब बागेत 5 ते 6 फूट उंचीची गांजाची लहान-मोठी झाडे सापडली. त्यांचे वजन 133 किलो 91 ग्रॅम होते. याची किंमत 13 लाख 39 हजार 100 रुपये आहे. याबाबतची फिर्याद हवालदार श्रीशैल वळसंग यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.


गांजा शेतीसाठी जत तालुका कुप्रसिद्ध 
जत तालुक्यात अनेक ठिकाणी गांजा शेती करण्यात येत असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. पोलिसांनी या विरोधात वेळोवेळी कारवाई करत गांजा शेती उद्ध्वस्त देखील केली आहे. मात्र तरीही इथे गांजाची शेती करणं हे सुरुच असल्याचं या कारवाईनंतर पुन्हा एकदा समोर आलं आहे.


एप्रिल महिन्यात ऊसाच्या शेतात छापा, 25 किलो गांजा जप्त 
याआधी एप्रिल 2022 मध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला होता. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पांढरेवाडी इथल्या मुंजेवस्ती इथे ही घटना उघडकीस आली होती. सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात दोन लाख 57 हजार रुपये किमतीचा गांजा सापडला होता. 25 किलो 700 ग्रॅम इतक्या वजनाचा हा गांजा होता. त्यानंतर उमदी पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतलं.