Sangli News : सांगली जिल्ह्यातील तुंग येथील प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagadi) हिचा पहिली महिला महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खाडे यांनी प्रतीक्षाला प्रोत्साहनपर वैयक्तिक रोख एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. तसेच यापुढे तिच्या वाटचालीसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल आणि तुंग इथे आधुनिक कुस्ती केंद्र बांधण्याची संकल्पना लवकरच प्रत्यक्षात आणू, अशी ग्वाही दिली.


सांगलीमध्ये रंगलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तुंगच्या प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा पहिला बहुमान पटकावला. लपेट डावावर प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला चितपट करत बाजी मारली. या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी 'किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं. 


सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत राज्यातील 400 हून अधिक महिला कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विजय मिळवत प्रतीक्षाने चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. याबद्दल प्रतीक्षाचा मिरज विधानसभा भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे आणि भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे प्रमुख उपस्थित होते. सुरेश खाडे यांनी तुंग इथे भव्य असे आणि सोयीसुविधांनी सुसज्ज महिलांसाठी निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन प्रतीक्षाला यापुढे लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली.


प्रतीक्षा बागडीचे यश हे सांगलीकरांसाठी अभिमानाचे प्रतीक : सुरेश खाडे


पैलवान प्रतीक्षा बागडीचे यश हे सर्व सांगलीकरांसाठी अभिमानाचे प्रतीक आहे. तिच्या या यशाने सांगलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे मत डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. पैलवान प्रतीक्षा हिने मिळवलेले यश तिच्या जिद्दीचे आणि कष्टाचे प्रतीक आहे. सांगलीत झालेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 400 हून अधिक महिला पैलवान सहभागी झाल्या होत्या. या सर्वांमध्ये उत्तुंग कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घालणे ही सोपी गोष्ट नव्हती. तिच्या या यशाने आजच्या तरुणाईसमोर एक आदर्श उभा राहिला आहे, असे सुरेश खाडे यांनी म्हटलं. या सत्कार प्रसंगी सुरेशभाऊ खाडे यांनी प्रतिक्षाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करत यापुढेही तिच्या वाटचालीसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल आणि तुंग इथे आधुनिक कुस्ती केंद्र बांधण्याची संकल्पना लवकरच प्रत्यक्षात आणू अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे, प्रतीक्षाचे वडील रामदास बागडी, बाबासाहेब आळतेकर तसेच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.