सांगली : अजित पवार गटाकडून ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली (Sangli) जिल्ह्याची जबाबदारी घेतली होती. या जबाबदारीनंतर अजित पवार यांनी आता सांगली जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची काल (23 ऑगस्ट) सायंकाळी मुंबईत एक बैठक घेत चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या अनेक समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील या बैठकीला हजेरी लावल्याने हे सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत जाणार का याची चर्चा आता सुरु झाली आहे. या बैठकीत 'तुम्ही एकसंध राहा, मी सांगलीच्या 'विकासाचे प्रश्न मार्गी लावतो' असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे समजते. तसेच लवकरच विट्यातून अजित पवारांचा सांगली दौरा होणार असल्याचीही माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीला कोण कोण उपस्थित?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची काल मुंबईत सायंकाळी बैठक घेतली. बैठकीला जयंत पाटील यांच्या अनेक समर्थकांनी मुंबईतील बैठकीला हजेरी लावली. सांगली जिल्ह्याची राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनेची जबाबदारी स्वतःवर घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच बैठक घेतल्याने आणि या बैठकीला राष्ट्रवादीच्या जयंत पाटील गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील बैठकीला हजेरी लावलेल्यांमध्ये माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव इस्लामपुरातून भाजपचे स्वरुपराव पाटील, भीमराव माने, सुरेखा लाड, तासगावमधून प्रताप पाटील, अरुण खरमाटे, साहेबराव पाटील, बाळासाहेब पाटील यांचा समावेश होता. यातील बहुतांश नेते जयंत पाटील यांचे पाटील, नेतृत्व मानणारे आहेत. इस्लामपूरचे जयंतराव समर्थक राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांनीही अजितदादांची भेट घेतली आहे. तासगावातून प्रताप पाटील यांच्यासह तासगाव तालुक्यातील काही नेते आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार आहेत.
अजित पवार आणि जयंत पाटील यांचे गट पडणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातील काही मोजक्याच कार्यकर्त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. बहुतांश राष्ट्रवादी जयंत पाटील यांच्या पाठिशी असल्याचे चित्र होते. पण काल मुंबईत अजित पवार बोलावलेल्या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याने हे सर्वजण अजित पवार गटात जाणार का आणि मग जिल्ह्यात अजित पवार गट आणि जयंत पाटील गट पडणार का हे पाहावे लागणार आहे.
जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक, भाजप नेतेही बैठकीत
जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक, भाजपचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांनीही मुंबईतील बैठकीला हजेरी लावली होती. महाडिक आणि त्यांचे बंधू सम्राट महाडिक सध्या भाजपमध्ये आहेत. तरीही अजित पवार यांच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. यामुळे जयंत पाटील यांना हा शह देण्याचा प्रयत्न आहे का याचीही चर्चा आता सुरु झाली आहे.
VIDEO : Sangli : अजित पवारांच्या बैठकीला जयंत पाटलांचे समर्थक, शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसणार?
हेही वाचा