मुंबई : राष्ट्रवादीतून (NCP) फुटून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांनी आपल्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो न वापरण्याची ताकीद दिली होती. तरी देखील अजित पवार गटाकडून फोटो वापरण्यात येत नव्हते. अखेर शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोर्टात जाऊ म्हटल्यावर शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. 


अजित पवारांनी बंड केल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली आहे. फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात फोटोवरून शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते आमने-सामने आल्याचे दिसले. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात होता. शरद पवार हे आमचे दैवत आहेत, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात होता.पण स्वतः शरद पवारांनी अजित पवार गटाला इशारा दिला. फोटो वापराल तर कोर्टात खेचेन असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला. त्यानंतर अजित पवार गटाकडून खबरदारीचा उपाय म्हणून फोटो न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


बीड सभेच्या टिझरमध्येही शरद पवार नाहीत


राष्ट्रवादीत काका पुतण्यात फुट पडल्यावर पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही नेते काकाच्या तर काही नेते पुतण्याच्या गटात सहभागी झाले. जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) हे अजित पवारांच्या गटात गेले. बुधवारी योगेश क्षिरसागर यांच्या  फ्लेक्सवर शरद पवारांचा फोटो नसल्यानं माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर फ्लेक्स बाबतचा सूचनांची सूत्रांकडून 'एबीपी माझा'ला माहिती दिली.  नुकताच बीड सभेचा टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात देखील शरद पवार यांच्या फोटोचा व्हिडीओमध्ये वापर करण्यात आलेला नाही. 


छगन भुजबळांचा शरद पवारांना टोला 


शरद पवारांनी फोटो वापरल्यास कोर्टात जाण्याची ताकीद दिल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांना टोला लगावला होता.  आतापर्यंत फोटोचा अवमान झाला किंवा अनादर झाला म्हणून कोर्टात गेल्याच्या घटना पाहिल्या होत्य. परंतु आदराने आपला फोटो लावला म्हणून कुणी कोर्टात गेले, असे उदाहरण मी पाहिलेले नाही असा टोला मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांना लगवला होता. 


हे ही वाचा :


Sharad Pawar : राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर, यांना जनताच खरी जागा दाखवेल; शरद पवारांचा सरकारवर घणाघात