Sangli News : कृष्णा नदीत (Krishna River) होड्यांच्या स्पर्धेदरम्यान (Boat Race) एक बोट उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बोटमध्ये असणाऱ्या सहा जणांना पोहता येत असल्याने ते सर्व नदी काठावर सुखरुप पोहोचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु या घडलेल्या घटनेमुळे आयोजक धाबे चांगलेच दणाणले होते.  


सांगलीत (Sangli) रविवारी (24 जुलै) कृष्णा नदीत होड्यांची स्पर्धा भरवल्या होती. स्पर्धा सुरु असताना आयर्विन पुलाखाली दोन होड्या अचानक समोरासमोर आल्या. यातील एक होडी तिरकी करुन बाजूला घेण्याच्या प्रयत्नात होडीचालक होता. परंतु पात्रात पाण्याचा वेग जास्त असल्याने होडीत पाणी शिरले आणि बोट उलटली. होडीमधील सहा तरुण नदीमध्ये पडले. परंतु ते सर्वजण पोहत काठावर आल्याने बचावले. उलटलेली बोट पाण्याच्या प्रवाहात खाली वाहून जात असताना  यावेळी दुसऱ्या बोट चालकांनी ही बोट जाऊन ताब्यात घेतली. 




होड्यांचा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी तुफान गर्दी
सांगलीवाडी, कसबे डिग्रज, कवठे पिरान, समडोळी अशा सांगलीच्या पंचक्रोशीतील गावातील जवळपास दहा होड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्वामी समर्थ घाटावरुन स्पर्धेला सुरुवात झाली. कृष्णेच्या पात्रातला वेगवान होड्यांचा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी कृष्णा काठावर आणि आयर्विन पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र या शर्यतीच्या वेळी आयर्विन पुलाखाली पाण्याच्या प्रवाहात एक होडी पाण्यात उलटली.  होडीतील सर्व तरुणांना पोहता येत असल्याने ते पोहत नदी काठी पोहोचले आणि मोठी दुर्घटना टळली. 


होड्यांच्या शर्यतीला 50 वर्षांची परंपरा 
होड्यांच्या शर्यतीला 50 वर्षांपासूनची परंपरा लाभली आहे. सांगलीच्या कृष्ण नदीपात्रामध्ये होड्यांची शर्यत आयोजित करण्याची परंपरा आजही कायम आहे. पावसाळ्यात पाणी ओसरल्यानंतर होड्यांच्या शर्यतीला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये कृष्णेच्या पात्रात होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात येतं. केवळ पश्चिम महाराष्टात सांगलीमध्येच कृष्णेच्या पात्रात अशा होड्याच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळतो. कोरोनामुळे दोन वर्षे होड्यांच्या स्पर्धा झाल्या नव्हत्या. कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.