Sangli News : सांगली (Sangli)जिल्ह्यातील कवठेमहांकाळमध्ये (Kavathe Mahankal) कत्तलीच्या उद्देशाने तब्बल 57 जनावरे (Animals) डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सर्व जनावरांची प्राणीमित्रांनी मुक्तता करत साडेसहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यामध्ये गायी आणि इतर जनावरे कत्तल करण्यासाठी शेडमध्ये बाळगल्याप्रकरणी कवठेमहांकाळमधील संशयित बाजीराव ज्ञानू चंदनशिवे  रोहित सुनील चंदनशिवे, अनिकेत मधुकर चंदनशिवे  या तिघांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. तिघांकडून मोटार आणि जनावरांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.


चारा पाण्याची सोय न करता कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना बांधून ठेवलं


कवठेमहांकाळ जवळील जत रस्ता परिसरात दोन पत्र्यांच्या शेडमध्ये जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती प्राणीमित्रांना मिळाली. त्यांनी सोमवारी (10 जुलै) रात्री सुमारास डायल 112 वर कॉल करुन मदत मागितली. कवठेमहांकाळ पोलिसांच्या मदतीने कवठेमहांकाळ भागातील शिवाजीनगर, गगनमाले वस्तीजवळ, थबडेवाडी  हद्दीत या ठिकाणी पाहणी केली. शेडमध्ये नऊ देशी गायी, तीन जर्सी गायी, गायीची 15 वासरे, दोन म्हैस, सहा लहान रेडे, एक लहान रेडी अशी एकूण 30 जनावरे चारा पाण्याची सोय न करता कत्तलीच्या उद्देशाने दोरीने घट्ट बांधून ठेवल्याचे दिसून आले. तसेच एक गाय बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. या गायीला जागोजागी इजा झाली होती. शेडची पाहणी केल्यानंतर आतमध्ये दोन धारदार शस्त्रे आढळली. 


57 जनावरे व पिकअप असा साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात


प्राणी मित्रांच्या फिर्यादीनुसार बाजीराव चंदनशिवे, रोहित चंदनशिवे, अनिकेत चंदनशिवे यांच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पोलिसांच्या मदतीने शेडच्या आजूबाजूला पाहणी केली असता जनावरांचे अवशेष आणि हाडे दिसून आली. संबंधित जनावरे ही बाजीराव ज्ञानू चंदनशिवे यांची असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कवठेमहांकाळ एमआयडीसी येथेही दोन शेडमध्ये छापा घातला. तिथे तीन देशी गायी, पाच जर्सी गायी, एक म्हैस, 18 रेडी, एक गाय अशी एकूण 27 जनावरे आणि पिकअप  असा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही जनावरे रोहित चंदनशिवे आणि अनिकेत चंदनशिवे यांची असल्याचे निष्पन्न झाले. एकूण 57 जनावरे व पिकअप असा साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.


हेही वाचा


Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यात जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश; 5 लाख किमतीची जनावरे ताब्यात