Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) विविध ठिकाणांहून दुभत्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी दोघांना अटक करत पाच लाखांवर किंमत असलेली जनावरे ताब्यात घेतली. जिल्ह्यातील सात गुन्हे संशयितांकडून उघडकीस आले आहेत. जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.


एका महिलेचाही संशयितांमध्ये समावेश 


पोलिसांनी युवराज मल्लाप्पा तेली (वय 24, मूळ गाव केंपवाड, ता.कागवाड, कर्नाटक, सध्या रा.इचलकरंजी), राहुल यमनाप्पा सनगुंडे (वय 22, रा.डेक्कन गल्ली, गल्ली नं. 1 इचलकरंजी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. इचलकरंजीतील एका महिलेचाही या संशयितांमध्ये समावेश आहे. अजून त्या महिलेला अटक करण्यात आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात जनावरे चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, चोरीला गेलेली जनावरे पुन्हा परत मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तक्रारदारांकडून गुन्हे दाखल करण्यात येत होते. जयसिंगपूर पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती मिळवून तपास यंत्रणा गतिमान केली.


संशयित युवराज तेली व राहुल सनगुंडे हे दोघेजण जनावरे चोरुन विकत असल्याची माहिती मिळाली होती. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर निमशिरगाव येथील गाय चोरुन नेल्याची कबुली त्यांनी दिली. शिवाय त्यांच्याकडून शिरोळ, हातकणंगले, हुपरी, करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरलेली 4 लाख 70 हजार रुपये किंमतीची 11 जनावरे ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, पोकाॅ, प्रभावती सावंत, डावाळे, अमोल अवघडे, वैभव सुर्यवंशी, होमगार्ड बेडगकर यांच्या पथकाने केली.


सशस्त्र दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बालिंगामधील कात्यायणी ज्वेलर्स भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन आरोपींना अवघ्या 36 तासांमध्ये अटक करून गुन्ह्याचा उलघडा करण्यात कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. दोन आरोपींकडून तब्बल 29 लाख 88 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात थरकाप उडवणाऱ्या या दरोड्याचा उलघडा झाला आहे. एलसीबीने दरोड्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शिताफीने तपास करत आरोपी विशाल धनाजी वरेकर (वय 32, रा. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलजवळ,कोपार्डे ता. करवीर जि.कोल्हापूर) व सतीश सखाराम पोहाळकर (वय 37, रा. कणेरकर नगर, रिंग रोड, फुलेवाडी, कोल्हापूर) यांच्या मुसक्या आवळल्या. विशाल हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या