Sangli Municipal Corporation : सांगली महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत एका सेकंदात तब्बल वीस विषयांना मंजुरी देण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. यानंतर आता सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी याबाबत खुलासा केला आहे. अशा प्रकारे एका सेकंदात 20 विषयांना मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वास्तविक महासभेसमोर 18 विषय होते. यामध्ये 15 विषय हे नामकरणाचेच होते, तर एक विषय हा भूखंड अदलाबदलीचा होता आणि भूखंड अदलाबदली बाबतच्या विषयाचा निर्णय अजून स्थगित असल्याचा महापौरांनी स्पष्ट केले.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेची महासभा नुकतीच पार पडली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सदस्यांच्या प्रत्येक विषयावर चर्चा होईल,असं महासभेच्या सुरुवातीला स्पष्ट केलं होतं. त्यामुळे विषय पत्रिकेच्या वाचनापूर्वीच तीन तास महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यावर वादळी चर्चा झाली. मात्र, तीन तास चर्चा होऊनही काहीही निर्णय झाला नाही. त्यामुळे विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास अडीच वाजता सुरुवात झाली.
शेवटी दुखवट्याचे व अभिनंदनाचे ठराव वाचन झाल्यानंतर विषय पत्रिकेतील मुख्य विषय चर्चेत येणार होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी महापौर महीनुद्दीन बागवान यांनी सभा तहकूब करून पुन्हा सोमवारी महासभा घेण्याची मागणी केली. काही सदस्यांनी सभा तहकूब करण्यापेक्षा विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्याचे सुचवले. भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा एक विषय प्रलंबित ठेवून अन्य विषयाच्या मंजुरीस नाहरकत दिली. त्यामुळे केवळ एका सेकंदात सर्व विषयांना मंजूर देऊन सभा संपवण्यात आली.
सर्व नामकरणाचे विषय अंतिम मंजुरी असल्यामुळे मान्यता
यातच काही भूखंडाची अदलाबदल करण्यासही मंजुरी देण्यात आली आणि याची चर्चा सुरु झाली. पण यातील महासभेच्या पटलावर एकूण विषयापैकी 18 विषय होते आणि त्यातले तीन विषय महत्वाचे आणि बाकीचे विषय हे रस्त्याचे नामकरण आणि सोसायटी नामकरणाच्या अंतिम मंजुरीचे होते. हे सर्व नामकरणाचे विषय अंतिम मंजुरी असल्यामुळे त्याला मान्यता देण्यात आली असे महापौरानी स्पष्ट केले. शिवाय 17 नंबरच्या विषय हा कुपवाडमधील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचा आहे. हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडसाठी 16 मीटरचा रस्ता भूमी संपादन करायचा विषय प्रशासनाकडून आला होता. हे भूसंपादन झाल्याशिवाय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला जायचा जो रोड आहे तो महापालिकेच्या ताब्यात येणार नव्हता. भूखंड आदलाबदलीचा जो विषय होता त्यामध्ये महापालिकेच्या जागी लगत असलेल्या एका भूखंडाची अदलाबदल केल्याने त्या भूखंडावर चिल्ड्रन पार्क किंवा बगीचा उभारण्यास येणार होते.
या सगळ्यांवर साधक बाधक चर्चा झाली आणि यातील एक विषय आम्ही प्रलंबित ठेवला आहे आणि त्या विषयावर सूचना हरकती मागून मग मंजूर केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितलं. त्यामुळे एका सेकंदामध्ये 20 विषयांना मंजूर दिली असं झालं नसल्याचं महापौरानी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या