Sanjay Patil: निवडून येण्यासाठी लोकांमध्ये राहावं लागतं, असा टोला भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेते विशाल पाटील यांना लगावला. गत लोकसभा निवडणुक तिरंगी झाली होती, ज्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना 3 लाखांचा आसपास मते मिळाली होती, पण आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्याची बेरीज नक्की आपल्या मतांमध्ये होईल. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजय आपलाच होईल ,असा विश्वास संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. 


जत्रा आली आहे म्हणून सराव करणारा मी पैलवान नाही, आमची तयारी कायम सुरुच असते. मागील लोकसभा निवडणुकीत मला 6 लाखांवर मते मिळाली होती. आमदार गोपीचंद पडळकरांना तीन लाखांच्या घरात मते होती. आम्ही दोघे एकत्र असल्याने यंदा 9 लाखावर मताधिक्य जाईल, असा दावा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी केला. संजय पाटील म्हणाले की, काँग्रेसकडून लोकसभेची तयारी सुरु असली व त्यांचा उमेदवार ठरला तरी त्याचा आम्ही विचार करत नाही. कोणीही आले तरी यावेळी मताधिक्यात मोठी वाढ दिसेल. काही पैलवान जत्रा आली की, व्यायाम करायला सुरुवात करतात. आमचा कायमचाच सराव असतो. 


ते पुढे म्हणाले की, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत वीजबिलावर होणारा मोठा खर्च टाळण्यासाठी 200 मेगावॅटचा चौदाशे कोटी रुपयांचा वीज प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केला आहे. म्हैसाळच्या विस्तारीत योजनेसही मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या दोन्ही योजनांचे भूमीपूजन लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्य शासन विस्तारीत प्रकल्पासाठी 972 कोटी रुपये देणार आहे. विस्तारीत योजनेमुळे पाण्यापासून वंचित जत तालुक्यातील 65 गावांना लाभ मिळेल.


सौर वीज प्रकल्पासाठी 2021 मध्ये प्रस्ताव दिला होता. एका आंतरराष्ट्रीय लेखपरीक्षण संस्थेमार्फत योजनेचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर सौर प्रकल्पास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. 24 ते 26 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल. ही योजना वीजेबाबत स्वयंपूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिलाचा भार सोसावा लागणार नाही. या कामासाठी लवकरच वर्कऑर्डर दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. म्हैसाळ योजनेप्रमाणे टेंभू उपसा सिंचन योजनाही सौरउर्जेवर चालविण्यासाठी प्रस्ताव दिला जाईल. त्याचाही आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सर्व्हे केला जाईल. जिल्ह्यातील सर्व योजना सौरउर्जेवर चालल्या तर शेतकऱ्यांना त्या परवडतील, असे पाटील यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या