Shivaji University: शिवाजी विद्यापीठातील पेपर फुटीचे ग्रहण कायम आहे. बी.कॉम. तृतीय वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. शेवटचा पेपर फुटल्याचे कारण देत पुन्हा घेण्यात आला असला, तरी सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या 25 ते 31 मे या कालावधीत या परीक्षा झाल्या. मात्र, पेपर सुरु होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल झाल्या होत्या. व्हायरल प्रश्नपत्रिका डमी असेल म्हणून काही शिक्षकांनी प्रकरण गंभीरपणे न घेता दुर्लक्ष केले होते.  पण पेपर संपल्यावर तोच पेपर व्हायरल झाला असल्याचे समोर आले.  


बुधवारी दुपारी अडीच वाजता शेवटचा ॲडव्हान्स अकाउंटन्सी टॅक्सेशनचा पेपर सुरू झाल्यानंतर तासाभराने रद्द करण्यात आला. पेपर फुटल्याने हा निर्णय घ्यावा लागला. नव्या प्रश्नपत्रिकेसह पुन्हा परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी सायंकाळी साडेपाचपर्यंतचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. अन्य सर्वच पेपर याच पद्धतीने फुटले होते, पण ते गांभीर्याने घेण्यात आले नाहीत.


दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. यामध्येही काॅपी करण्याचे प्रकार समोर आले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या भरारी पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कारवाई करताना तब्बल 50 हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. बी. कॉम., बी. ए., कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, डिझाईन, आर्टस अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन, आर्टस् (ड्रेस मेकिंग अँड फॅशन को-ऑर्डिनेशन), कॉमर्स बँक मॅनेजमेंट, सोशल वर्क, बी. कॉम (आयटी), बी. ए. डिफेन्स स्टडी, इंटेरियर डिझाईन या अभ्यासक्रमांच्या सोमवारी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणांची नोंद भरारी पथकांनी परीक्षा प्रमाद समितीकडे केली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या