Dr. Tatyarao Lahane: आम्हाला जेव्हा बाजू मांडू दिली नाही याचा अर्थ यामागे कोणीतरी असावे, हे निश्चित वाटतं. अधिष्ठातांची चौकशी करावी आणि चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. त्या लीड करणाऱ्या होत्या. त्यामुळे आम्ही तशी मागणी केली आहे. दुसरी मागणी होती आमचा राजीनामा मंजूर करावा तो झाला आहे. पेशंट हा माझा आत्मा आहे, त्या पेशंटची सेवा मी जन्मभर करणार आहे. खेडोपाड्यात जाऊन गरीबांचे अश्रू पुसले, हे काम मनापासून केलं आहे. काही करायचं राहिलेल नाही याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया डाॅ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे. लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
डाॅ. तात्याराव लहाने एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, जून 2021 मध्ये मी सेवानिवृत्त झालो आहे. सेवानिवृत्तीनंतर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचं काम मला दिलं होतं. आणि महाराष्ट्रभर ते काम मी करत होतो. 22 मे रोजी ला आमची तक्रार झाली आणि त्या तक्रारीची चौकशी केली जात नव्हती. तेव्हा अधिष्ठातांना विनंती केली होती की तुम्ही अधिकारी बदलावा. महिला छळ प्रकरणी डाॅ. रागिणी यांनी चौकशी केली होती, पण तसं झालं नाही. विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही हा तो चुकीचा धांदात खोटारडा आरोप होता. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही शस्त्रक्रिया शिकवल्या होत्या. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया चालू होत्या. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचेही ट्रेनिंग सुरु होते. या विद्यार्थ्यांना शिकता यावं आणि प्रत्येक ऑपरेशन टीव्हीवर दाखवत होते, पण जे काही आरोप केले गेले तर ते खरे नाहीत.
कुठे माशी शिंकली माहीत नाही
आम्ही सगळेजण एकत्र बसून एका डॉक्टरचा 9 तारखेला आम्ही वाढदिवस साजरा केला होता. ऑपरेशन थिएटर बंद होते. रागिनी मॅडम सुट्टीवर होत्या. त्यानंतर कुठे माशी शिंकली माहीत नाही. काहीच न होता तक्रार केली गेली. त्यामुळे काम निपक्षःपणे करणे शक्य नव्हते. म्हणून मग आम्ही सर्वजण एकत्र आलो त्यामध्ये ठरवले की आता आपला राजीनामा द्यायचा. म्हणून आम्ही राजीनामे दिले. अतिशय खालच्या पातळीने बोलले जात नव्हते ते योग्य नव्हतं, चौकशी होत नव्हती.
गरीब रुग्णांना दृष्टी देत आलो, त्यांना आंधळे होताना आम्ही बघू शकत नाही
आम्ही 38 पिढ्यांना शिकवलं आहे. नुकतीच पास होऊन आलेली मुलं असा आरोप करतात आणि दबाव टाकून सहा महिन्यांनी शस्त्रक्रिया करायला सांगतात, हे आम्हाला योग्य वाटलं नाही. कारण आजपर्यंत आम्ही गरीब रुग्णांना दृष्टी देत आलो आलो आहे, त्यांना आंधळे होताना आम्ही बघू शकत नाही. म्हणून जे सहाव्या महिन्यात जे मोतीबिंदू शिकवतात त्यांना आणावं आणि शिकवावं. म्हणून आम्ही जागा मोकळ्या केल्या. शासनाकडे आम्ही विनंती केली होती की राजीनामा मंजूर करावे आणि शासनाने ते मंजूर केले आहेत. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही शासनाचे ऋण व्यक्त करतो.