Sangli News : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आज सांगली (Sangli News) महापालिकेत अभिरुप महासभा पार पडली. या महासभेत महापालिका क्षेत्रात बिबट्या, गवा, सांभार या वन्य प्राण्यांचा पकडण्याचे टेंडर काढण्याचे तसेच दक्षिण आफ्रिकेकडून चित्ते मागण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभिरुप सभेचे पीठासीन अधिकारी तथा महापौर म्हणून आयुक्त सुनील पवार यांनी काम पाहिले, तर आयुक्तांची भूमिका महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बजावली.


या अभिरुप महासभेत प्रशासनाची भूमिका नगरसेवक तर नगरसेवक पदाधिकारी यांची भूमिका काहीवेळ प्रशासकीय अधिकारी सांभाळतात. ही अभिरुप सभा आल्याने या सभेत अनेक गमतीदार विषय पटलावर मांडले जातात आणि त्या विषयावर चर्चाही केली जाते. आज अभिरुप महासभेत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना चंद्र व मंगळ ग्रहावर पर्यटनासाठी जाण्यासाठी महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये अंतराळ स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हत्ती आणि घोड खरेदीचा निर्णय 


महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांना दुबई अभ्यास दौरा करण्यास पाठवण्याचा आणि येताना दुबईतून कंदील व दिवे आणण्यास मान्यता देण्यात आली. याच अभिरूप महासभेत महापौर यांच्यासाठी रोल्स रॉयल किंवा मर्सडीज बेंझ गाडी घेण्याच्या विषयाला नगरसेवकांनी विरोध केला, तर या गाड्या नगरसेवकांच्या मानधनातून न घेता शासनाच्या निधीतून घेण्याची सूचना अभिरुप नगरसेवकांनी केली. यावर अभिरुप सभेचे महापौर सुनील पवार यांनी महापौरांना रोल्स रॉयल किंवा मर्सडीज बेंझ गाडी घेण्याऐवजी हत्ती अंबारीसह आणि उपमहापौर व अन्य पदाधिकारी यांच्यासाठी घोडे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महापालिकेच्या नगरसेवकांची नोंदणीकृत ठेकेदार वर्ग अ म्हणून नोंदणी करण्यासही मान्यता देण्यात आली.


याच अभिरुप सभेत आयत्या वेळेत कृष्णा नदी कुपवाडकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अधिकाधिक आयत्या वेळचे विषय घ्यावेत आणि त्यावरच चर्चा करावी असे अभिरुप महासभेचे महापौर सुनील पवार यांनी जाहीर केले. या अभिरूप महासभेत प्रशासनाच्या जागेवर नगरसेवक पदाधिकारी तर नगरसेवक पदाधिकारी यांच्या भूमिकेत प्रशासकीय अधिकारी पाहायला मिळाले. त्यामुळे या सभेमध्ये झालेले संवाद, विनोद आणि कानपिचक्या पाहता या अभिरूप महासभेत हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. 


जागतिक विषयांनी चर्चेत रंगत 


जागतिक दर्जाचे विषय सांगली महापालिकेच्या अभिरुप सभेत घेतल्यामुळे या चर्चांना आणखी रंगत आली. उपायुक्त राहुल रोकडे यांनी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांची तर अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे यांनी उपमहापौरांची भूमिका बजावली होती. उपायुक्त स्मृती पाटील यांनी नगरसेविका रोहिणी पाटील यांची तर नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांची भूमिका बजावली. नगरसचिव म्हणून नगरसेविका अनारकली कुरणे यानी तर गटनेत्या म्हणून मनीषा जासूद यानी काम पाहिले. काँग्रेस नगरसेविकेची भूमिका भाजपाच्या नगरसेविका भारती दीगडे यांनी तर योगेंद्र थोरात यांची भूमिका अमर चव्हाण आणि गिरीश पाठक यांनी बजावली. 


इतर महत्वाच्या बातम्या