वहिवटीचा वाद, गर्भवतीला रस्ता नाकारला; झोळीतून नेण्याची वेळ, सांगलीतील धक्कादायक घटना!
Sangli Miraj Crime News : मिरजमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वहिवटीच्या वादामुळे एका गर्भवती महिलेला रस्ता नाकारल्याची दुर्दैवी घटना घडली.
Sangli Miraj Crime News : मिरजमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वहिवटीच्या वादामुळे एका गर्भवती महिलेला रस्ता नाकारल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रचंड वेदनेत असणाऱ्या गर्भवती महिलेला गावकऱ्यांनी झोळी करुन रुग्णालयात नेलं. या घटनेनंतर मिरज तालुक्यात संतापाचं वातावरण आहे. मिरज तालुक्यातील आरग या गावात ही दुर्दैवी घटना घडली.
झोळीतून झाडाझुडपातून वाट काढत नेलं -
वहिवटीच्या वादातून गर्भवतीला रुग्णवाहिकापर्यंत येण्यास रस्ता न मिळाल्याने तिला चक्क झोळीतून नेण्याची वेळ नातेवाईकावर आल्याची घटना मिरज तालुक्यातील आरग गावामध्ये घडली आहे. या प्रकरणाचा ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित गर्भवतीचे कुटुंब व शेजारील शेतकऱ्यांसोबत रस्ता वहिवटीचा वाद सुरू आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने पीडित महिलेच्या नातेवाईकांना वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. रस्ता वहिवटीचा वाद तालुका दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू आहे. पण मंगळवारी पीडित महिलेला तीव्र वेदना सुरू झाल्या, तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली. शेजारील शेतकऱ्याला रस्ता देण्याची विनंती केली. परंतु तालुका दंडाधिकारी यांच्या कोर्टात खटला सुरू असल्याने संबंधित शेतकऱ्याने रस्ता देण्यास नकार दिला. यामुळे त्या गर्भवती महिलेला चक्क झोळीत घालून झाडाझुडपातून वाट काढत रुग्णू वाहिकेपर्यंत नेण्यात आले. रस्ता नसल्याने सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत महिलेला झोळीतून नेण्यात आले. त्यानंतर तिला बाळंतपणासाठी मिरजेच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दोन वर्षांनंतरही निर्णय नाही.
महसूल विभागाकडे शेतरस्त्याचे अनेक दावे वर्षानुवर्षे निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आरगमधील माळी कुटुंबियांचा रस्ताही त्यातच अडकून पडला आहे. रस्ता अडविल्याने त्यांना शेती करणे मुश्किल झाले आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या ऊसासाठी मंडलाधिकाऱ्यांनी अन्य शेतकऱ्याला विनंती करुन तात्पुरता रस्ता दिला, पण आज गर्भवतीसाठी मात्र तो मिळाला नाही. नऊ महिन्यांच्या वेदना सहन केलेल्या गर्भवतीला आजचे काही तास मात्र जन्मजन्मांतरीची सहनशीलता पाहणारे ठरले.
गावकऱ्यांनी सर्व प्रयत्न केले, पण...
गर्भवतीला वेदना होऊ लागल्याने कुटुंबियांना 108 रुग्णवाहिकेला हाक दिली. ती धावत आलीदेखील, पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तिच्या कुटुंबियांनी संबंधित शेतकऱ्याशी फोनवर संपर्क करुन रुग्णवाहिकेसाठी रस्त्यासाठी विनंती केली, पण त्यानं ऐकलं नाही. रुग्णवाहिकेसोबतच गर्भवतीही ताटकळली होती. नवा जीव जगात येण्यासाठी आसुसला होता, पण माणुसकी जणू त्याचीही परीक्षा घेत होती. गावकऱ्यांनी माहिती मिळताच धाव घेतली. तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य यांनीही धाव घेतली. संबंधित शेतकऱ्याला फोनवर फोन केले. गर्भवतीसाठी आणि रुग्णवाहिकेसाठी रस्त्यासाठी साद घातली. पण माणुसकीचा पाझर फुटला नाही.
यादरम्यान, माळी कुटुंबियांनी गावात मंडलाधिकाऱ्यांपुढे गाऱ्हाणे मांडले. त्यांनीही मध्यस्थीचे प्रामाणिक प्रयत्न केले. पण तोडगा निघत नसल्याचे पाहून माळी कुटुंबिय थेट तालुक्याला तहसीलदारांकडे आले. गर्भवतीची सुटका करण्याची विनंती केली. तहसीलदारांचा विचारविमर्श होईपर्यंत गर्भवतीच्या कळा क्षणाक्षणाला वाढत होत्या. तहसीलदारांचा निर्णय झालाच नाही, तोपर्यंत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी गर्भवतीला झोळीत घातले. काट्याकुट्यातून, ओढ्याओघळीतून आणि बांधाबांधांवरुन रुग्णवाहिकेकडे आणण्याचा प्रयत्न केला. आडवे आलेले गेट उघडले. शेतकऱ्याने घातलेला बांधही तात्पुरता दूर केला. कसेबसे रुग्णवाहिकेत घातले.