सांगली : सांगली लोकसभेला भाजप खासदार संजय पाटील यांच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय पाटील यांच्या उमेदवारी विरोधात रोष समोर येत असतानाच आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्षालाच रामराम केला आहे. त्यामुळे भाजपला सांगलीमध्ये तगडा हादरा बसला आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देताना थेट काँग्रेसच्या विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 


संजय राऊत यांना सुद्धा झटका


विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीन दिवस सांगली दौरा करताना विलासराव जगताप यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत चंद्रहार पाटील यांना पाठिंबा न देता विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने संजय राऊत यांना सुद्धा झटका बसला आहे. दरम्यान, सांगलीमधील भाजपची नाराजी समोर येण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी सुद्धा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही खडे बोल सुनावले होते. 


माझे अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून


माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे की, भारतीय जनता पार्टीमध्ये मी आजपर्यंत पक्ष वाढीसाठी काम केलं आहे. परंतु, पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे माझ्या विरोधात गट बांधण्याचे व माझे अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून करण्यात आलं आहे. ते मला सहन करणे शक्य नाही. त्यामुळे मला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो. तरी मी आपल्या भाजप पक्षाचा राजीनामा देत आहे. 


विलासराव जगताप यांनी भाजपवर जाहीर नाराजी करत पक्षाला रामराम केला असतानाच दोन दिवसापूर्वी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी सुद्धा भाजपला घरचा आहेर दिला होता. विश्वासात घेऊन काम केलं नसल्यास जी आज अवस्था काँग्रेसची आहे तीच अवस्था भाजपची सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजप मंत्र्यांसह नेत्यांना सुद्धा खडे बोल सुनावले होते. विशेष म्हणजे पृथ्वीराज देशमुख यांनी भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यावरती जोरदार  टीका केली होती. ही टीका करत असताना बाजूलाच मंत्री सुरेश खाडे हे सुद्धा बसले होते. 


विशाल पाटील कमालीचे नाराज


एक बाजूला भाजपमधून संजय पाटील यांना विरोध होत असतानाच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सांगलीमध्ये घमासान सुरू आहे. ठाकरे गटाने प्रतिष्ठा पणाला लावत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांना आमदार विश्विजत कदम यांच्याकडून बळं दिलं जात आहे. त्यामुळे विश्वजीत कदम यांच्या पाठिंबावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर विशाल पाटील हे सांगलीच्या रणांगणात उतरणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. विशाल पाटील सांगलीमध्ये अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या