सांगली : विश्वासात घेऊन काम केलं नाही, तर काँग्रेसची जी अवस्था आहे, ती भाजपची व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी घरचा आहेर दिला. देशमुखयांनी भाजप मंत्र्यांसह नेत्यांना खडे बोल सुनावत भाजपला घराचा आहेर दिला. सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर देखील आगपाखड केली. पृथ्वीराज देशमुख हे सांगली लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक होते, पण भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच तिकीट दिल्याने देशमुख नाराज आहेत. हीच नाराजी देशमुख यांनी बोलून दाखवली. 


देशमुख यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली


सांगली लोकसभा निवडणुक निमित्ताने पलूसमध्ये आयोजित बूथ संमेलन कार्यक्रमात देशमुख यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. यावेळी भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर पृथ्वीराज देशमुख यांनी निशाणा साधत नेत्यांना घरचा आहेर दिला. या कार्यक्रमात भाजपचे नेते, कामगार मंत्री आणि पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.


सांगली मतदारसंघात पक्षाचे किती कार्यक्रम घेतले?


देशमुख म्हणाले की, पाच वर्षात खासदारांनी सांगली मतदारसंघात पक्षाचे किती कार्यक्रम घेतले? आम्ही पक्षात काम करत असताना काय चुकलो? आम्ही जिल्हा परिषद आणली, महानगरपालिका आणली. मात्र, तुम्ही बैठक न घेताच खासदारांची उमेदवारी जाहीर केली. याची काय गरज होती? ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्याच खासदारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. इच्छुक असूनही आम्हाला का डावलले गेले, याचे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या पद्धतीने द्यायला हवे? पक्षाच्या विरोधात तसेच संघाच्या विरोधात बोलणारा माणूस उमेदवार म्हणून कोणत्या आधारावर जाहीर केला?


20 इच्छुक उमेदवारांनी 46 उमेदवारी अर्ज घेतले


दरम्यान, सांगली लोकसभेला पहिल्या दिवशी 20 इच्छुक उमेदवारांनी 46 उमेदवारी अर्ज घेतले. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले आहेत. उर्वरित अर्जात अपक्षांचेच जास्त अर्ज आहेत. त्यापैकी कुणीही अर्ज दाखल केले नाहीत. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले आहेत. यामुळे त्यांची बंडखोरी निश्चित समजली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या