मिरज (जि. सांगली) : मिरज शहरातील गणेशोत्सवामध्ये (Miraj Ganesh) अनंत चतुर्दशी दिवशी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत (Sangli Ganesh) मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे लावलेल्या 35 सार्वजनिक मंडळांविरुध्द गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तत्पूर्वी, त्यांना सात दिवसांची कारणे दाखवा नोटीसही दिली असल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक संजीव झाडे (Sangli Police) यांनी दिली.


डीजेच्या आवाजाबाबत 42 मंडळांचे रिडींग घेण्यात आले. यापैकी 35 मंडळांनी वाजविलेल्या डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा किती तरी जास्त होता. त्यामुळे त्यांच्याविरुध्द न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. याबाबत संबंधीत मंडळांच्या प्रमुखांना आवाजाच्या उल्लंघनाबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याचे संजीव झाडे यांनी यावेळी स्पष्ट केले.


मिरज 'आयएमए'चा डीजे, लेझर बंदीसाठी पुढाकार


दरम्यान, इंडियन मेडीकल असोसिएशन मिरज शाखेच्या वतीने डॉल्बी साऊंड आणि लेसर लाईट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम यावर वैद्यकीय तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गणेशोत्सव कालावधीत शहरात डॉल्बी आणि लेसरचा अतिवापर झाल्याने याबाबत गेल्या काही दिवसांपासून तक्रारींचा सूर वाढला आहे. नागरिकांनीही स्वतंत्र बैठक घेऊन पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. भविष्यात हा वापर कमी व्हावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आयएमएने लेसर आणि डीजेचे शरिरावर होणारे परिणाम यावर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी डॉ. मोहन पटवर्धन, डॉ. अमित जोशी, डॉ. शरद भोमाज, डॉ. शशिकांत दोरकर यांनी कान, हृदय, डोळे यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात सविस्तर माहिती दिली.


आयएमएचे अध्यक्ष डॉ. नथानियल ससे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बैठकीला डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. रियाज मुजावर, डॉ. शिरीष चव्हाण, डॉ. जीवन माळी, माजी अध्यक्ष डॉ. अजितसिंग चढ्ढा, डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. चंद्रशेखर हळींगळे, डॉ. अजय चौथाई, डॉ. हर्षल कुलकर्णी या नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांसह पोलिस निरीक्षक संजीव झाडे, उपायुक्त स्मृती पाटील यांनी हजेरी लावली होती. मिरवणूक कालावधीत होत असलेल्या चुकांबाबत कायद्याची अंमलबजावणी करताना अनेकांचा सामना करावा लागतो. यातून उत्सवामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता जास्त असल्याने कारवाई टाळली जाते. यामागे केवळ उत्सव शांततेत पार पडावा, हाच हेतू असतो, असे निरीक्षक झाडे म्हणाले.


यावेळी डॉ. शशिकांत दोरकर यांनी मर्यादेपेक्षा जास्त आवाजाचा कानावर काय परिणाम होतो, याची सविस्तर माहिती दिली. कानाची रचना क्लिष्ट असते. 70 डेसिबलपेक्षा जादा आवाज कानांना इजा पोहचवू शकतो. सतत डीजेच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींवर त्याचा निश्चित परिणाम होतो, अनेक दुष्परिणामांची माहिती दिली. डॉ. अमित जोशी यांनी जादा आवाजाने हृदयावर होणाऱया परिणामांची माहिती दिली. तर डॉ. शरद भोमाज यांने लेझरचा डोळ्यावर होणारा परिणाम कसा असतो, याचे स्पष्टीकरण केले. लेझरची क्षमता, त्याचे डोळ्यापासूनचे अंतर यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. या लेझरमुळे डोळ्याचे पडदे फाटूही शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. कार्यक्रमात व्यायामावर लक्ष केंद्रीत करणाऱया अनेकांचा सत्कारही करण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या