Sangli Crime: सांगली शहरातील रिलायन्स ज्वेलर्स शॉपी भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा टाकण्यात आलेल्या दरोड्यात कोट्यवधी रुपायांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले आहेत. गोळीबार करत कर्मचारी आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मारहाणही दरोडेखोरांनी केली. या दरोड्यातील काही आरोपी व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्या दृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत.


पोलीस असल्याचे भासवले  


दरोडेखोरांनी सांगली-मिरज रस्त्यावर मार्केट यार्डजवळ रिलायन्स ज्वेलर्स नावाच्या सोन्या-चांदीचे शोरूममध्ये आज (4 जून) रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी ग्राहक म्हणून शोरूममध्ये प्रवेश केला. शोरूममध्ये प्रवेश केल्यावर दरोडेखोरांनी पोलीस असल्याचे सांगितले. पेहरावही अगदी तशाच पद्धतीने त्यांनी केला होता. शोरुममध्ये घुसताच बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित येण्यास सांगितले. त्यांनी शोरुममधील दोन कर्मचाऱ्यांना शोरुममधील सोने, डायमंड पिशवीत भरण्याचा आदेश दिला. 


कर्मचाऱ्यांना बांधून घातले


दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावला होता. बंदुकीचा धाक दाखवित दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बांधून घातले. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. काही ग्राहकांनाही दरोडेखोरांना धमकी दिली. व्यवस्थापकाला मारहाणही केल्याचे समजते. त्यानंतर दुकानाच्या शोकेसमधील सोने-चांदीचे दागिने सोबत आणलेल्या बॅगेत भरले. 


पाळत ठेवून दरोडा


सांगली -मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. सांगली-मिरज रस्त्यावर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचाच फायदा दरोडेखोरांनी घेत सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने हा दरोडा टाकला. यावेळी दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटून नेण्यात आले. याची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु, दुकानाबाहेर श्वान घुटमळले. दरम्यान, दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके रवाना करण्यात आली आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या