Sangli Crime : मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये 20 जून रोजी घडलेल्या वनमोरे कुटुंबातील हत्याकांडाचा संपूर्ण उलगडा आज होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया या हत्याकांडाचा संपूर्ण उलगडा आज सायंकाळी पाच वाजता सांगलीत पत्रकार परिषदेत करणार आहेत. यामुळे मागील दह दिवसापासून राज्यभर गाजलेल्या या हत्याकांडाच्या मागच्या अनेक बाबी आज स्पष्ट होणार आहेत. दरम्यान या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी मांत्रिक अब्बास मोहंमदअली बागवान याच्या सोलापूर येथील घराची झडती घेत पोलिसांनी तंत्र-मंत्रासाठी वापरण्यात येणारे काही साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.


दोन सख्खा भावाच्या कुटुंबातील एकूण 9 जणांचे एकावेळी सापडलेले मृतदेह, यापैकी दोन मृतदेहाच्या खिशात सापडलेली अन् एकाच हस्ताक्षरात लिहिलेली  चिठ्ठी, चिठ्ठीत पैसे घेतलेल्याची नावे आणि त्यानंतर पोलिसांनी चिठ्ठीतील नावाप्रमाणे जवळपास 25 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाखल केलेला गुन्हा, 18 लोकांना अटक आणि शेवटी या 9 जणांच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा पोलिसांचा खुलासा...अशा नाट्यमय कलाटणी मिळालेल्या आणि सांगली जिल्ह्यातील आतापर्यंत सर्वांत मोठे हत्याकांड ठरलेल्या म्हैसाळमधील घटनेचा उलगडा करण्यात सांगली पोलिसांना 12 दिवसांत यश आले. आता या हत्याकांडाचा नेमका घटनाक्रम, चिठ्ठी मागचे गुपित, वनमोरे कुटुंबाने मांत्रिकाला गुप्तधन शोधून देण्यासाठी नेमकी किती रक्कम दिली होती, यासह घटनेमागच्या अनेक प्रश्नांची उत्तरे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आजच्या पत्रकार परिषदेत मिळणार आहेत. गुप्तधनाची आशा दाखवत मांत्रिकांनी वनमोरे कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. यानंतर 19 जून रोजी रात्री काळ्या चहामधून विषारी द्रव्य देऊन वनमोरे कुटुंबातील नऊ जणांचे हत्याकांड घडवले. मांत्रिक बागवान याच्या सोलापुरातील बाशा पेठ येथे तो राहात असलेल्या घराची झडती घेण्यात आली. या मांत्रिकाच्या अटकेनंतर त्याचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गायब झाले आहेत. 


चिठ्ठ्या नेमक्या कुणाच्या हस्तक्षरातल्या?
दोन मृतदेहाच्या खिशात ज्या चिठ्ठ्या पोलिसांना सापडल्या त्याच्या आधारे पोलिसांनी 25 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही चिठ्ठी या एकाच हस्तक्षरात आहेत. मात्र हे हत्याकांड असल्याचे समोर आल्यानंतर मग ही चिठ्ठी नेमकी कुणी लिहिलीय हे एक कोडे निर्माण झाले आहे. शिवाय चिठ्ठीमधील ज्याची नावे आहेत ते सगळेच सावकार नसून काही जणांनी वनमोरे कुटुंब अडचणीत आहे आणि त्यांनी मदत मागितली म्हणून काही जणांनी मदतीपोटी काही रक्कम दिली होती, अशी माहिती म्हैसाळमधील गावकऱ्यांनी दिली आहे. 


अटकेनंतर मांत्रिकाचे छातीत दुखत असल्याचे नाटक?
मांत्रिक अब्बास मोहंमदअली बागवान याला पोलिसांनी अटक केल्यानंतर सुरुवातीला आपल्या छातीत दुखत असल्याचे त्याने तक्रार करायला सुरुवात केली. पोलिसांनी खबरदारी म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करत तपासण्या करुन घेतल्या. मात्र तपासण्यामध्ये तो तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांनी अहवाल दिल्यानंतर बागवानला पोलिसांनी न्यायालयासमोर उभे करत त्याच्या पोलीस कोठडीची परवानगी घेतली. त्यानंतर पोलिसांना तपासात गती मिळाली आणि आधी म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबाच्या घरी त्याला नेऊन हत्येचा घटनाक्रम जाणून घेतला. पुढे त्याच्या सोलापूरमधील घराची झडती देखील घेतली. हत्याकांडानंतर बागवान हा म्हैसाळमधून सोलापूरला कसा गेला, तो कुठे थांबला होता, याचीही माहिती त्याच्याकडून घेण्यात आली.


संबंधित बातम्या