सांगली : इस्लामपूर पोलिसांच्या (Sangli Crime) गुन्हे शाखेच्या पथकाने पेठनाका येथे सापळा रचून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 60 लाखांचा गोवा बनावटीच्या 48 हजार बाटल्यांची वाहतूक केली जात होती. यामध्ये मालट्रकसह 75 लाखांचा मुद्देमाल आणि चालकास ताब्यात घेण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
इस्लामपूर पोलिस ठाण्याची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई
60 लाखांचा गोवा बनावटीच्या 48 हजार बाटल्या पकडून केलेली कारवाई ही इस्लामपूर पोलिस ठाण्याची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईत जत तालुक्यातील डफळापूरमधील सलमान मकानदार या ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा दारूसाठा कराड येथील जमील पटेलकडे जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी इस्लामपूर पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पेठनाका परिसरात सापळा लावला. रात्री दहाच्या सुमारास परिसरात नाकाबंदी लावत संशयित ट्रक (एमएच-50-एन 399) थांबविण्यात आला. यावेळी तपासणी केली असता तब्बल 60 लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा पोलिसांनी कारवाई करून जप्त केला.
ही कारवाई सहायक निरीक्षक चेतन माने, हवालदार विनायक देवळेकर, अभिजित पाटील, उदय पाटील, गुप्त वार्ता विभागाचे अमर जंगम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
स्वतःच्याच दुकानात चोरी केल्यामुळे मालकाला अटक
दरम्यान, सांगली पोलिसांच्या एलसीबी पथकाने काही दिवसांपूर्वी स्वतःच्याच दुकानात चोरी केल्याने स्पोर्ट्स शूज दुकानाच्या मालकाला अटक केली होती. दुकान तोट्यात आल्यानंतर इन्शुरन्सच्या पैशासाठी मालकाने हा बनाव रचल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं. विश्रामबागमधील एका स्पोर्ट्स वस्तू विक्रीच्या दुकानात चोरी झाली होती. दुकानमालकाकडून दुकानात चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली. मात्र, या चोरीच्या घटनेत ट्विस्ट आला. तो म्हणजे सदर दुकानाच्या मालकाने स्पोर्ट्सचे दुकान तोट्यात सुरू असल्याने इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच दुकानातील स्पोर्ट्स शूजची चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आलं. तपासात बाबी समोर आल्याने या चोरीच्या गुन्ह्यात फिर्यादीच आरोपी झाला. दुकानातील स्पोर्ट्स शूजची चोरी केल्याप्रकरणी दुकानमालकासह चोरीच्या वेळी मदत केलेल्या अशा दोघांना अटक करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या