Sangli Crime: पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाने उसणे दिलेले पैसे मागितले म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालून खून केल्याची संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमध्ये घडली. दादू आकडे असे दुर्दैवी बापाचे नाव असून खून करणारा पोटचा नराधम मुलगा लक्ष्मण हा फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लक्ष्मणने वडिलांकडून उसणे 80 हजार रुपये घेतले होते. ते आज (24 मे) वडील दादू आकडे हे मागण्यासाठी मुलाकडे गेले होते. यावेळी मुलाने अंगावर ट्रॅक्टर घालून वडिलांचा जीव घेतला. ही घटना समजल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. निर्दयी कृत्य केल्यानंतर मुलगा लक्ष्मण फरार झाला. फरार झाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करताना संशयित मुलगा लक्ष्मणला (वय 32 वर्षे) अटक केली.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण आणि त्याच्या वडिलांचा गेल्या काही दिवसांपासून पैशांसाठी तसेच जमीन नावावर करुन देण्यासाठी वाद सुरु होता. लक्ष्मणकडून वडिलांकडे सातत्याने पैशांची मागणी केली जात होती. लक्ष्मणने जमीन नावावर करण्यासाठी सुद्धा तगादा लावला होता. मात्र जमीन नावावर करण्यास वडिलांनी विरोध केला होता. त्यामुळे लक्ष्मणने वडिलांना सरळ ट्रॅक्टरखाली चिरडून मारले. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दीपक लांडगे या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. पण या मुलाचा मृत्यू कर्नाटकातील एका मांत्रिकाच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मांत्रिकाच्या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
आर्यनला सतत ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून आर्यनला एका नातेवाईक महिलेने आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील एका मांत्रिकाकडे उपचारासाठी त्याला नेले होते. त्या मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरु असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या