Sangli News: सांगलीतील (Sangli) तासगावच्या आमदार सुमनताई पाटील (Sumantai Patil) सिंचन योजनांच्या पाण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. येत्या चार ते पाच दिवसात पूर्ण क्षमतेने पाणी न दिल्यास सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. तासगाव- कवठेमहांकाळ या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या टेंभू योजनेतून शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनांचा निर्णय घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. टेंभू व म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेतून सध्या आवर्तन सुरू असून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील भागाला पुरेसे पाणी मिळालेले दिसून येत नसल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 


आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून पाहणी दौरा 


तालुक्यातील भागाला पुरेसे पाणी मिळालेले दिसून येत नसल्याने सुमनताई पाटील स्वतः दोन्ही योजनेचे पाणी कोणत्या भागात किती पाणी आले हे पाहण्यासाठी दौरा केला. यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी व तासगाव तालुक्यातील जरंडी, यमगरवाडी, दहिवडी या गावांना पुरेसे पाणी मिळत नाही. सध्या झालेल्या योजनेतून पुरेसे पाणी मिळेल असे पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, ज्यावेळी सिंचन योजनेच्या बंदीस्थ पाईपमधून पाणी आले, त्यावेळी ते अतिशय कमी येत आहे. हे पाणी सिंचन योजनेसाठी पुरेसे नसल्याचे लक्षात आले.


कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना


गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावरील शेतकरी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करत होते. आमदार पाटील यांनी या भागात भेट देऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या चार ते पाच दिवसात पूर्ण क्षमतेने पाणी न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा  इशारा दिला. यावेळी त्यांनी दोन्ही योजनेची सुरू असलेल्या कामाची ही पाहणी करून कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना दिल्या. यावेळी जरंडी, घाटनांद्रे, तिसंगी, यामगरवाडी, दहिवडी, येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.


जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 


जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दरवर्षीपेक्षा जास्त उन्हाळा सध्या जाणवत आहे. अनेक भागातील पिके उन्हामुळे करपू लागली आहेत. फळबागांना सुद्धा झळ सोसावी लागत आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक भागात टेंभू व म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आलं आहे. मात्र, ते पुरेसं आलेलं दिसत नाही. अनेक ठिकाणी पाणीपट्टी भरून शेतकरी बांधव पाण्याची मागणी करत आहेत. परंतु, त्यांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. तलाव भरून देण्याबाबत शेतकरी बांधव मागणी सातत्याने करत आहेत. पाणी सोडण्याबाबत मी वेळोवेळी पाटबंधारे खात्याकडे विनंती केली आहे. येणाऱ्या चार ते पाच दिवसात त्वरित पाणी सोडण्याची व्यवस्था व्हावी. अन्यथा, मला आपल्या कार्यालयासमोर माझ्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांना घेऊन उपोषणास बसण्याशिवाय पर्याय नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या