सांगली : सांगली लोकसभा (Sangli Loksabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सांगली जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा आज (25 एप्रिल) होत आहे. या मेळाव्यात विशाल पाटील (Vishal Patil) यांचे बंड आणि त्यांची अपक्ष उमेदवारी आणि कारवाईबाबत काय निर्णय होतो? याकडे लक्ष असणार आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम, सांगली जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत आणि जिल्ह्यातील काँगेस नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस नेते मविआचा धर्म पाळण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देणार का?
सांगलीच्या भावे नाट्यगृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यातून काँग्रेस नेते मविआचा धर्म पाळण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देणार का आणि विशाल पाटील यांच्याबाबत काय काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे. सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील रिंगणात आहेत. मात्र, चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले असताना काँग्रेसकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म सांगलीमध्ये पाळला जातो की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. विशाल पाटील यांच्यावर प्रदेश पातळीवरून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
विशाल पाटील यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार केके विशाल पाटील यांच्यावर कारवाई करायची झाल्यास अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांच्या सहीच्या पत्राने कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे कारवाईचे कोणतेही अधिकार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये सुद्धा माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी कोल्हापूर लोकसभेला शाहू महाराजांच्या विरोधामध्ये बंडखोरी केली होती. त्यांनी अखेरच्या टप्प्यामध्ये उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केल्याने काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांना माघारीसाठी विनंती केली गेली होती. मात्र, बाजीराव खाडे यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली नव्हती. अखेर प्रदेश पातळीवर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे.
असे असताना शेजारच्या सांगलीत विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर मात्र कारवाई अजून झालेली नाही. त्यामुळे सुद्धा काँग्रेसच्या कारवाईवरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर आणि चंद्रहार पाटील यांच्या एकंदरीत प्रचारावर काँग्रेस नेते काय भूमिका घेणार? याकडे लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या