सांगली : शेतकऱ्याचं आणि बैलांचं नातं वेगळंच असतं, बैल (bullocks) हा शेतकऱ्याचा जवळचा मित्र असतो. शाळेत असताना आपण पाखऱ्या नावाचा धडा वाचला असलेच. कारण, आबाचा पाखऱ्या नावाचा बैल आणि त्या पाखऱ्यावर जडलेला आबांचा जीव या दोन्ही नात्यांची कथा सांगणारा हा धडा होता. तसेच, बैलगाडा मालकांचेही आपल्या बैलजोडीवर नितांत प्रेम असते. बैलगाडा शर्यतीसाठी आपल्या बैलजोडीला वापरुन नंबर जिंकायचा हे स्वप्न बैलगाडा मालकांचे असते. त्यासाठी, ते बैलजोडीची जीवापाड काळजी देखील घेत असतात. मात्र, आपल्या बैलांची जीवापाड काळजी करणाऱ्या बैलगाडा मालकांच्या बैलजोडीला शर्यतीतच मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात दोन बैलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दु:खद आणि मन हेलावणारी घटना सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात घडली आहे.
तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे बैलगाडी शर्यती दरम्यान बैलगाडीवरील ताबा सुटून बैलजोडी गाडीसह तलावात गेली. या अपघातात बैलजोडीतील दोन्ही बैलांना फास लागून ते तलावात बुडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गव्हाण गावात यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यती दरम्यान मणेराजुरी हद्दीतील साठवण तलावापासून ह्या बैलजोड्या परत फिरणार होत्या. मात्र, या दरम्यान एका बैलजोडीला तलावाजवळून परत फिरता आले नाही. त्यामुळे, ही बैलजोडी थेट सुमारे 30 फुट खोल तलावात गेली. तलावात गाडी गेल्यानंतर बैलांच्या गळ्यातील सापत्या आणि कासऱ्याचा बैलांना फास लागला. त्यामुळे, बैलगाडीतून बाहेर पडताना न आल्याने दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनं येथील बैलगाडा शर्यतीला गालबोट लागले असून बैलगाडा मालकांनी व उपस्थितांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.