Sangli Accident : विटा सातारा रोडवर नेवरी गावाजवळ आज (4 मे) सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एकाच कारमधील पाचपैकी चौघांचा समावेश आहे. यामध्ये 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. अपघातात एकजण जखमी असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील सर्वजण तासगाव तालुक्यातील गव्हाण गावचे आहेत. ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली व्यक्ती अपघातानंतर गाडीत असलेल्या एअर बॅग उघडल्याने बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि मालाड (मुंबई) येथील बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत. हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान शिवाजीनगरच्या पुढे विटा हद्दीत झाला. विटा पोलीस ठाण्यात अपघाताबात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी विट्याकडून ट्रॅव्हल्स (एआर- 01-जे-8452) ही गाडी विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरून सातारच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी सातारकडून येणारी फोर्ड फिएस्टा ही कार विटाच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर असलेल्या उताराच्या ठिकाणी हा अपघात झाला. कार गाडीमध्ये एकूण पाच जण प्रवास करीत होते. 


ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली व्यक्ती अपघातानंतर गाडीत असलेली एअर बॅग उघडल्याने बचावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अपघात पाहण्यासाठी याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. कारचालकाला झोप आल्यामुळे हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. परंतु, वारंवार या  रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताने या रस्त्याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :