Sangli Ganesh 2022 : तासगावमधील प्रसिद्ध श्री गणपती पंचायतनचा 243 वा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रथोत्सवादिवशी गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होते.
'मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात, अलौकिक व नयनरम्य सोहळ्यात हा रथोत्सव पार पडला. 'मंगलमुर्ती मोरया’ च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात. गणपती मंदिर ते समोर अर्धा किमीवर असलेल्या श्री काशिविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ ओढत नेला जातो. रथ ओढण्यास सुरवात झाल्यानंतर गुलाल व पेढ्यांची झालेली उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांझपथक, समोर दिमाखात चालणारी ‘गौरी’ हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. हा रथ काशिविश्वेश्वराच्या मंदीरापर्यंत ओढत नेला जातो.
कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर यंदा तासगावात गणेशोत्सवाचा आणि रथोत्सव सोहळ्यात मोठा उत्साह दिसून आला. मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इ. स. 1779 मध्ये तासगावच्या श्री सिद्धिविनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून ही परंपरा अपवाद वगळता अखंड सुरू आहे.
रथोत्सव सोहळ्यात लाकडी कोरीवकाम केलेला आणि लोखंडी चाके असलेला हा तीनमजली रथ भाविक दोरांच्या सहाय्याने ओढतात. रथातून आणि रथाबाहेरून लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने रथावर नियंत्रण ठेवले जाते. या रथातून 'श्री गणेश' पित्याच्या भेटीसाठी काशिविश्वेश्वर मंदिरापर्यंत जातात, तेथे आरती होऊन ते पुन्हा मंदिरात परततात, अशी आख्यायिका आहे. रथामध्ये 'श्रीं'ची पंचधातूची उत्सवमूर्ती आणि मानकरी बसलेले असतात.
इतर महत्वाच्या बातम्या