Sangli News:गेल्या पाच-सात वर्षांत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेल्यांपैकी 90 टक्के साहित्यिकांनी काहीही वाचलेले नाही. असेच सुरू राहिले, तर उद्या कदाचित जो बायडेनदेखील अध्यक्ष होतील, असे परखड भाष्य साहित्यिक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले. कवी संग्राम हजारे यांच्या ‘रिकामटेकड्यांचे आत्मवृत्त’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते सांगलीमध्ये बोलत होते.
दिग्दर्शक, कवी नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या आटपाट प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी संग्राम बापू हजारे यांच्या 'रिकामटेकड्याचे आत्मवृत्त' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास रामदास फुटाणे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश सप्रे, किशोर कदम, नागराज मंजुळे, उमेश कुलकर्णी, प्रा. संजय साठे, डॉ. संजय चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी किशोर कदम यांनी संग्राम बापू हजारे यांच्या अनेक कविता म्हणून दाखवल्या. या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे सूत्र संचालन नागराज मंजुळे केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कवी प्रेमी उपस्थित होते.
आपल्याला 10 दिवसापूर्वीच्या मंत्र्यांचे नाव आठवत नाही पण...
रामदास फुटाणे म्हणाले की, मी भाष्य, कविता करतो. राजकारणाच्या पलिकडेही जाऊन निखळ आनंदाची अनेक क्षेत्रे आहेत, त्यात रमले पाहिजे. हा समारंभ त्यातला आहे. सध्या राजकारणात काय चालू आहे, धनुष्यबाण चिन्ह कुणाकडे जाईल याच्याशी कवी, साहित्यिक यांचा काही देणेघेणे नाही. आपल्याला 10 दिवसापूर्वीच्या मंत्र्यांचे नाव आठवत नाही पण कुसुमाग्रज यांचे नाव आजही आहे.
भाषणांपेक्षा कविताच ताकदवान, कवितेत समाज एकसंध ठेवण्याची ताकद
कवितेत समाज एकसंध ठेवण्याची ताकद आहे. चांगली कविता वाचण्याची सवय लागायला हवी. हल्लीचे समीक्षक साहित्यात काय आहे ते सांगण्याऐवजी काय नाही हेच सांगतात. त्यांनी विचार करावा. विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी. त्यामुळे भाषणांपेक्षा कविताच ताकदवान आहे. ती समाज एकसंध बांधण्याचे काम करू शकेल असे फुटाणे म्हणाले.
संग्राम बापू हजारे म्हणाले की, चौथीपासून न कळत्या वयात मला लिहण्याची प्रेरणा मिळाली हा प्रवास पुढे ग्रेस..आरती प्रभू, अरुण कोल्हटकर अशा माझ्या आवडीच्या कवितांनी अधिक समृध्द केला. माझं लेखन मनाच्या पोकळीचा शोध घेणारं आहे. ते येतं कसं, हे मला सांगता यायचं नाही. ते प्रसिध्द व्हावं, यासाठी लिहलं नाही. मात्र नागराज आणि माझ्या या सर्व घरच्यांनी मायेने घडवून आणलेल्या या समारंभात मला बोलायला शब्द सुचत नाहीत, असं संग्राम बापू हजारे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Nagraj Manjule : ... हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय; नागराज मंजुळेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत