सांगली : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेली ठाकरे आणि शिंदे गटातील वादाची लढाई गणेशोत्सवात (Ganeshotsav 2022) देखील महाराष्ट्रभर पाहायला मिळणार असं चित्र आहे. याची सुरुवात सांगलीतील मिरजमधील गणेशोत्सव काळात उभारल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अशा कमानी उभारण्यावरुन होताना दिसत आहे. कारण मिरज मधील श्री महाराणा प्रतापसिंह चौकात ठाकरे आणि शिंदे गटातील स्थानिक कार्यकर्त्यांनी कमान उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे. या चौकात आतापर्यंत शिवसनेकडून भव्य अशी कमान उभारली जात होती. मात्र शिवसेनेतून बंड करून वेगळ्या झालेल्या शिंदे गटातील स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील नेमक्या त्याच चौकात कमान उभारण्याची परवानगी मागितल्याने पोलिसांनी दोन्ही गटाला श्री महाराणा प्रतापसिंह चौकात कमान उभारण्यास हरकत घेतली आहे. 


एकाच चौकात कमान उभारणीसाठी दोन्ही गटाची मागणी


दुसरीकडे मात्र मिरजेतील इतर सर्व ठिकाणी कमानी उभारण्यास परवानगी मिळालेल्या कमानी उभारण्याच्या कामाला सुरुवात झालीय. सध्या महाराणा प्रतापसिंह चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत मैगुरे यांनी तर शिंदे गटाकडून महेंद्र चडाळे यांनी मिरज शहर पोलिसांकडे कमान उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच दोन्ही गटांकडून आम्हीच मूळ शिवसैनिक असल्याचा दावा केला जात आहे. मिरजेत गणेशोत्सवाच्या स्वागत कमानीवरच्या जागेवर मिरजमधील ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी हक्क सांगत आपली कमान लावण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली.




श्री महाराणा प्रतापसिंह चौकातील कमानीचा वाद


मिरजमधील प्रसिद्ध असलेली कमान उभारणीची मागणी ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकाच चौकात केली गेल्याने हा कमानीचा मुद्दा वादाचा विषय बनलाय. या वर्षी शिवसेनेतील फुटीमुळे दोन गटांनी पारंपरिक जागेवर हक्क सांगितल्याने तेढ निर्माण झाला आहे. मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान उभारण्याची शिवसेनेची परंपरा आहे. यंदा या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटानेही हक्क सांगितला आहे.




कमान उभारणीची 25 वर्षांची परंपरा
मिरजेतील गणेशोत्सवाच्यावेळी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर स्वागत कमानी उभारण्याची गेल्या 25 वर्षाची परंपरा आहे. स्वागत कमानीवर राजकीय नेत्याबरोबरच पौराणिक, ऐतिहासिक दृश्ये नयनरम्य देखावे विद्युतझोतात प्रदर्शित करण्याची परंपरा असून या स्वागत कमानींची 50 फुटापर्यंत तर लांबी 80 फुटापर्यंत असल्याने ही कमान आगळंवेगळं वैशिष्ट्य ठरत आलं आहे. मात्र यंदा एकाच चौकात ठाकरे बरोबरच शिंदे गटाकडून कमान उभारण्याची मागणी केली गेल्याने मिरज शहर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असल्याने दोन्ही गटाला कमान  उभारणीची परवानगी देण्यात हरकत घेतली आहे.