सांगली : सांगली लोकसभेला (Sangli Loksabha) भाजप खासदार संजय पाटील (Sanjay Patil) तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. पाटील यांनी शक्तीप्रदर्शनाने सांगली लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या सभाही झाली. संजय पाटील यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता 48 कोटी 31 लाख 39 रुपये इतकी आहे. उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय दाखवण्यात आला आहे. खासदार संजय पाटील यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे दहा लाखाचे सोने, तर पत्नीकडे 24 लाखांचे सोनं आहे. 


पत्नीकडून 32 कोटींचं कर्ज 


खासदार संजय पाटील (Sanjay Patil Net Worth) यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 30 कोटी 50 लाखांहून अधिक आहे. संजय पाटील यांच्या पत्नी ज्योती यांनी 32 कोटी 31 लाख रुपये असुरक्षित कर्ज एसजीझेड ॲण्ड एसजीए शुगर कंपनी तुरचीला दिले आहेत. संजय पाटील यांची 2019 च्या निवडणुकीत त्यांची मालमत्ता 19 कोटी 11 लाख 92 हजार रुपये इतकी होती, तर कर्ज 2 कोटी 33 लाख रुपये होते. 2024 च्या निवडणुकीत खासदार संजय पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता 2 कोटी 48 लाख 45 हजार रुपये असल्याचे जाहीर केले आहे. स्थावर मालमत्ता 45 कोटी 82 लाख 93 हजार रुपये आहे. 


कर्जाचा आकडाही 51 कोटी रुपयांनी वाढला 


बँका व वित्तीय संस्थांकडील कर्ज 53 कोटी २ लाख 52 हजार रुपये इतके आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत मालमत्तेमध्ये 29 कोटी रुपयांची भर पडली आहे. कर्जाचा आकडाही 51 कोटी रुपयांनी वाढला आहे.


लोकांशी संपर्क कमी झाला


दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना संजय पाटील म्हणाले की, लोकांच्या आशीर्वादाने 10 वर्ष काम करत आहे. मी मोदी साहेबांचा सैनिक म्हणून काम करत आहे. सगळ्या पक्षांची शक्ती आपल्या बाजूला आहे. रोज अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी काम करत आहेत, सत्ता कायमची नसते पण मिळालेली सत्ता लोकांसाठी वापरणे महत्वाचे आहे. दोन वर्षापूर्वी मला साखर कारखान्याच्या अडचणी आल्या. त्या अडचणींमधून मार्ग काढत असताना लोकांशी संपर्क कमी झाला. एका वर्षामध्ये मी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलो. सगळ्यांनी सहकार्य केलं, बँकेकडून कर्ज घेतलं. एक साखर कारखाना मी विकला आणि आज डोक्यावर कर्ज खांद्यावर आणून ते जमिनीवर आणलं आहे, असे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या