सांगली : मराठा आरक्षण मागणीसाठी तसेच जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत आंदोलकावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सांगलीत आज मराठा क्रांती मोर्चाकडून (Sangli Maratha Kranti Morcha) विराट 2.0 भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे आज मराठा वादळ घोंगावले. या मोर्चात महिला, तरुणींचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात संभाजी भिडे सुद्धा सहभागी झाले होते. या मोर्चाचे मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाकडून आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या नेटक्या नियोजनामुळे मोर्चा शांततेत पार पडला.
मशाल हाती घेत महिलांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात
या मोर्चाला सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला. विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांना पुष्पहार अर्पण करून आणि 100 वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आल्या. मशाल हाती घेत महिलांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा सुरू असताना संततधारदार पावसाने हजेरी लावली. क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ झाला.
तर आणखी आक्रमक पध्दतीने मराठा मोर्चा रस्त्यावर उतरेल
राममंदिर चौकात मोर्चाच्यावतीने एका तरुणीसह पाच युवकांनी आरक्षण मागणीसाठी भाषण केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचेही वाचन करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत मूक असणारा मोर्चा आता घोषणापर्यंत गेला आहे. जर सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत योग्य तो विचार केला नाही, तर आणखी आक्रमक पध्दतीने मराठा मोर्चा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा संयोजकानी दिला.
मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या मागण्या
1) ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या जातींचे फेरसर्वेक्षण करुन या यादीतून प्रगत जातीना वगळण्यात यावे, राज्यातील ओबीसी जातींची संख्या व त्यांच्या लोकसंख्येची जनगणना करुन सर्वेक्षण करा.
2) राज्यातील फुगीर आरक्षण कमी करुन मराठा समाजाचा गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा 50% ओबीसीमध्ये समावेश करावा.
3) 19/12/2018 च्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षण अंतर्गत अन्याय झालेल्या PSI राज्यसेवा 2017, RTO 2017 मधील महिलांना शासकीय सेवेत समावून घ्या. तसेच EWS TO PSI 2020, SEBC TO EWS महाराष्ट्र इंजिनिअरिंग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम उमेदवार नियुक्त्यांचा प्रश्न सोडवा.
4) समांतर आरक्षण व खुला सर्वसाधारण गटात अर्ज, दावा आणि स्पर्धा करणाऱ्या उमेदवार प्रवर्गात समावेश करणारा कायदा बनवून ओपनमध्ये संरक्षण द्या.
5) मराठा तरुणांच्या शैक्षणीक अडचणी व वस्तीगृहाचे प्रश्न सोडवा
6) अण्णासाहेब पाटील सक्षम बनवून तरुणांना येणाऱ्या अडचणी सोडवा
7) सारथी संस्थेला मनुष्यबळ व वाढीव निधी देऊन MOA नुसार सर्व योजना सुरू करा
इतर महत्वाच्या बातम्या