Rohit Patil: अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे तातडीनं पचनामे करावेत. पंचनामेच होणार नसतील तर सरकार कुठल्या निकषावरती शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असा सवाल राष्ट्रवादी युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी राज्य सरकारला केला आहे. आज कुठेही पंचनामे होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात असल्याचे रोहित पाटील म्हणाले.
कोणत्या निकषावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देणार
अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी फळबागा पडल्या आहेत. तर कुठे बेदाणा भिजला आहे. राज्य सरकारनं तातडीने अवकाळीचे पंचनामे सुरु केले पाहिजेत असे रोहित पाटील म्हणाले. आज पंचनामे कुठेही होत नाहीयेत. पंचनामेच होणार नसतील तर सरकार कुठल्या निकषावरती अनुदान देणार आहे असा सवाल रोहित पाटलांनी उपस्थित केला. राज्यातील एकही मंत्री शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे आहोत, असं सांगताना दिसत नाही. त्यामुळं कुठल्या आधारावरती किंवा कुठल्या निकषावर आपण या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देणार आहेत, हे सुद्धा मंत्र्यांनी स्पष्ट करावं असं रोहित पाटील म्हणाले. त्यामुळं त्वरित पंचनामे झाले पाहिजेत ही मागणी सर्व द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादकांच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचे रोहित पाटील यांनी म्हंटलय.
नुकसानीचा आकडा मोठा
एखाद्या शेतकऱ्याच्या बांधा संदर्भात निर्णय घ्यायचा असता तर तो मंत्रालयामध्ये बसून घेता आला असता. मात्र, आता परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा असल्याचे रोहित पाटील म्हणाले. आता शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन काही निर्णय थेट घेणं गरजेचं होतं. आता अयोध्येत जाऊन जर महाराष्ट्रामधील शेतकऱ्याच्या बांधावरचे प्रश्न सुटणार असतील तर मात्र सर्व सामान्य जनता जनतेला वेठीस धरल्याप्रमाणे ही अवस्था असल्याचे पाटील म्हणाले.
मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करु नये
शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम कुठल्याही मंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करू नये. शेतकऱ्यांना फार काळ नुकसानभरपाई देण्यापासून वेठीस धरणं योग्य नसल्याचे रोहित पाटील म्हणाले. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले गेले त्या पद्धतीने त्वरित पंचनामे, अनुदान वाटप या सगळ्या बाबतीत सरकारकडून तातडीने निर्णय घेणं अपेक्षित आहे असेही रोहित पाटील म्हणाले.
आजपासून पुढचे पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: