Maharashtra Sangali News: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं (Sangli District Bank) वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याची मोहीम हाती घेतल्यनं कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या. मात्र जत तालुक्यातील (Jath Taluka) जिल्हा बँकेच्या काही उत्साही पाच ते सहा अधिकाऱ्यांनी या काळातच गोवा (Goa) गाठलं आणि पर्यटनाचा आनंद लुटला. मात्र या पर्यटनाचे फोटो त्यांनीच सोशल मीडियावर टाकले आणि पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, असा काहीसा प्रकार घडलाय. कारण या फोटोमुळे या पर्यटनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना आली आणि मग बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उचलत या सर्वांची जिल्ह्याच्या एका ठिकाणाहून जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाच्या ठिकाणी बदली केली. म्हणजे, जत तालुक्यातून या पर्यटनाचा आनंद घेतलेल्यांची थेट शिराळा तालुक्यात बदली करण्यात आली. ऑनड्युटी सहलीचा आनंद लुटताना त्यांनी गोव्यात गेलेल्या मौजमस्तीचा फोटो बॅंक कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळेच त्यांचा कारनामा समोर आला आणि कारवाई झाली.


सांगली जिल्हा बँकेनं वसुलीसाठी प्रत्येक कर्मचार्‍यांना लक्ष्य ठरवून दिलं आहे. या वसुलीसाठी प्रसंगी सुटीलाही फाटा देण्याच्या सक्तसूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, शनिवार आणि रविवारची सलग सुट्टी आणि सोमवारची रजा टाकून जत तालुक्यातील आठ कर्मचार्‍यांनी गोव्याच्या सहलीचं नियोजन केलं. नियोजनाप्रमाणे तीन दिवस गोवा सहलीची मौजही लुटली. मात्र, ही मौज लुटत असताना काही फोटो मात्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं. 


बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सारवासारव


कर्मचार्‍यांनी अतिरिक्त काम करून वसुलीचं लक्ष्य गाठावं आणि जास्तीत जास्त थकबाकीची वसुली करावी, अशी वरिष्ठांची अपेक्षा असताना हे कर्मचारी मौजमजेत सुट्टी घालवतात. हे वरिष्ठांच्या नजरेस आले. यामुळे या आठ कर्मचार्‍यांच्या तडकाफडकी शिराळा तालुक्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांच्याशी संपर्क साधला असता या बदल्या हा नियमित कामकाजाचा भाग असल्याचं सांगून सहलीची मजा म्हणून बदलीची सजा, असा काही प्रकार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बदली ही प्रशासकीय बाब असल्याचंही त्यांनी आवर्जुन सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 


जिल्हा बॅंकेनं पुढील दोन वर्षांत एनपीए शून्य टक्के करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी थकबाकी वसुली युद्धपातळीवर असून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाला ओटीएस योजना लागू करण्यात आली आहे. मार्चपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून या योजनेला जूनअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यास काही दिवसच बाकी आहेत. या मुदतीत शेतकऱ्यांची थकीत कर्जवसुली जास्तीत जास्त व्हावी, यासाठी बॅंकेनं अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द केल्या आहेत. सुटी दिवशीही या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्ज वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण जिल्हाभर ही मोहीम सुरू आहे. प्रशासनाच्या आदेशानंतरही जत तालुक्यातील आठ अधिकाऱ्यांनी मागील शनिवारी, रविवारी बॅंकेला असलेल्या सुटीला लागून एक रजा टाकली आणि गोव्यात मौजमजा करण्यासाठी धावले. इकडे शाखेतील अन्य कर्मचारी मात्र सुटीदिवशीही कामावर येत वसुली करीत होते. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी या आठ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी शिराळा तालुक्यात बदल्या केल्या.


'या' अधिकाऱ्यांवर कारवाई


बदली झालेल्यांमध्ये जत तालुक्यातील मार्केड यार्ड शाखेचे आर. टी. नाटेकर, बी. आर. दुधाळ, उमराणी शाखेतील एस. ए. कांबळे, उमदी शाखेतील एस. एम. सोलनकर, एम. एम. मुल्ला, एम. एम. पाटील, एस. एम. तेली आणि दरीबडची शाखेतील ए. यू. वाघमारे यांचा समावेश आहे. शिराळा तालुक्यातील बॅंकेच्या विविध शाखांमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.