Sharad Pawar: शिवसेनेमधील बंडनाट्य सुरु असतानाच आता त्याच नाट्यातील आणखी एक अध्याय राष्ट्रवादीच्या रुपाने सुरु झाला आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आम्हीच राष्ट्रवादी असा सूर लावला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडूनदेखील आम्हीच शिवसेना असा सूर लावला होता. त्यामुळे आता जिल्हानिहाय पक्ष कार्यकारिणी सुद्धा कोणासोबत राहणार याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये आता सांगली राष्ट्रवादीने (Sangli NCP) आपला निर्णय जाहीर केला आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादीने शरद पवारांच्या पाठिशी ठाम असल्याचे सांगितले आहे. जिल्हा कार्यकारिणीकडून आज भूमिका जाहीर करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि आमदार यांनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तासगावच्या आमदार सुमनताई पाटील, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक आणि विधानपरिषद आमदार अरुण लाड यांनी उपस्थिती लावत सांगली जिल्हा राष्ट्रवादी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांमागे ठामपणे असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादीची दुसरी फळी प्रीतीसंगमावर
दरम्यान, शरद पवार आज पुण्याहून कराडला प्रितीसंगमाच्या दिशेने येत असताना त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार सोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत बाबी हाताळण्यासाठी मुंबईत पक्ष कार्यालयात ठाण मांडून असतानाच त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील समर्थकांसह कराडात आले होते. दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील सुद्धा मतदारसंघातील समर्थकांसह प्रीतीसंगमावर शरद पवारांच्या स्वागतासाठी हजर होते. अजित पवारांच्या बंडाने पक्षावर काही फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
फार फरक पडेल, असे वाटत नाही
रोहित पाटील म्हणाले की, आज गुरुपौर्णिमा असल्याने आम्ही नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठा वाटा असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत घडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडलं ते अपेक्षित नव्हते. हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांच्या निर्णयांमुळे, धोरण आणि विचारधारेमुळे तळागाळापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे काल जे काही घडले त्याने फार फरक पडेल, असे वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पु्न्हा सर्वसामान्यांच्या ताकदीवर उभारी घेईल. आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही याठिकाणी आलो आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या