Sangli News : भावकीसोबत असणाऱ्या जमीन वाटपाच्या वादात आपल्याला न्याय मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने थेट दूरध्वनीच्या खांबावर चढून आंदोलन केल्याचा प्रकार घडला. सांगलीच्या जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे हा प्रकार घडला असून येथील शेतकऱ्याने जत मधल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर असणाऱ्या खांबावर चढून न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.


वाळेखिंडी येथील बापूसाहेब शिंदे असे या तरुण शेतकऱ्यांचे नाव असून त्याने जत शहरातल्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोर न्याय मिळावा या मागणीसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. थेट दूरध्वनीच्या खांबावर चढून न्याय देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. शिंदे यांच्या भावकीसोबत असणाऱ्या जमीन वाटपाच्या वादातून हा प्रकार घडला.


बापूसाहेब शिंदे यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या दुय्यम निबंध कार्यालयासमोरील दूरध्वनीच्या खांबावर चढून जोर-जोराने न्याय देण्याची मागणी करू लागले. हा प्रकार पाहून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अखेर जत नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश माने व काही जणांनी बापूसाहेब शिंदे यांची समजूत घालून त्यांना समजावून त्यांन न्याय देण्याचे आश्वासन देऊन खाली उतरवलं. मात्र शिंदे यांच्या खांबावरील या स्टंटबाजीच्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.


शेतकरी का चढला खांबावर?


शिंदे यांच्या वाळेखिंडी येथील शेतात असणाऱ्या विहिरीवर त्यांच्या भावकीकडून बेकायदेशीर आकडा टाकून वीज कनेक्शन घेण्यात आले होते. सदरचा प्रकार समोर आल्यानंतर वीज वितरण कंपनीकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर बापूसाहेब शिंदे यांनी भावकीला कायदेशीररित्या वीज कनेक्शन घेण्याचे बजावले. मात्र या उलट भावकीने शिंदेंन मारहाण केली. याबाबत बापूसाहेब शिंदे यांनी गावातल्या पंचांकडे न्याय देण्याबाबत मागणी केली.


मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर शिंदे यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. मात्र तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी बापूसाहेब शिंदे यांनी जमीन वाटप करण्यासाठी तहसीलदारांचा दरवाजा ठोठावला. त्यासाठी शिंदे शुक्रवारी जत मधल्या तहसील कार्यालय आवारात पोहोचले. मात्र, त्या ठिकाणी त्याची भावकीमधील कोणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बापूसाहेब शिंदे यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या दुय्यम निबंध कार्यालयासमोरील दूरध्वनीच्या खांबावर चढून जोर-जोराने न्याय देण्याची मागणी करू लागले.


इतर महत्वाच्या बातम्या