Jayant Patil : विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोडले आहे. त्यांनी ट्विट करून शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. 


महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद 1200 कोटींवरून 840 कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात, ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली 100 कोटी रुपयांची तरतूद कमी करून 10 कोटी करण्यात आली याबाबींकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे. 


राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते


दरम्यान, जयंत पाटील यांनी मागासवर्गीय निधीला लावलेल्या कात्रीवरून तोफ डागली असतानाच आणखी एक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांनी हा दावा केला. दोन दिवसांपूर्वीही जयंत पाटलांनी राष्ट्रपती राजवटीचा दावा केला होता. दरम्यान, यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यारून त्यांना कोणती माहिती मिळाली याबाबत विचारणार असल्याचे सांगितले. 


काय म्हणाले होते जयंत पाटील?


मंगळवारी जळगावात कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले की, तथापि, अपेक्षेप्रमाणे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यांनी दावा केला की शिंदे-फडणवीस सरकार मध्यावधी निवडणूक घेण्यास घाबरत आहे. शक्य तितक्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाजार समित्यांसह इतर सर्व निवडणुकाही पुढे ढकलण्याच्या मार्गांवर विचार करत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याच्या भूमिकेचे समर्थन करताना खासदार संजय राऊत यांनीही जयंत पाटील यांच्या परिस्थितीच्या मूल्यांकनाशी ते पूर्णपणे सहमत असल्याचे म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या