इस्लामपूर (जि. सांगली) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी (Hatkanangle Lok Sabha constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil on Hatkanangle Lok Sabha constituency) यांनी इस्लामपुरामध्ये कार्यकर्त्यांना चांगला दम भरला आहे. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवारांसाठी सर्वांनी घासून पुसून काम करायचं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगत कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला. इस्लामपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये जयंत पाटील यांनी लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असल्याचे सांगत बूथ नियोजन करण्याचे आवाहन केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत असल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


हातकणंगले लोकसभेला महाविकास आघाडीकडून शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून धैर्यशील माने रिंगणात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघांमध्ये तगडं आव्हान निर्माण केलं आहे. मात्र, राजू शेट्टी यांना  महाविकास आघाडीने पाठिंबा न देता उमेदवार दिल्याने चुरशीची लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे डी.सी. पाटील सुद्धा रिंगणात असल्याने चौरंगी लढत होत आहे. 


सर्वांनी घासून-पुसून काम करायचं 


जयंत पाटील सभेत बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी उमेदवाराचे सर्वांनी घासून-पुसून काम करायचं आहे. कोणाच्या घरी, कोणी चहा पिऊन गेले, मला चालणार नाही. आले, घरात बसले, आम्ही काय करू, असला धंदा बंद करा असा सज्जड दमही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. अचानक कोणी घरी आले तर, तुम्ही घरी जाऊ नका, बाहेर जावा असे सांगत सध्या इलेक्शन सुरू आहे. त्यामुळे तुमचे कोण, काय संबंध असतील, ते इलेक्शन नंतर असेही जयंत पाटील म्हणाले.


जे काम केले त्याचे श्रेयही घेतले जात आहे


जयंत पाटील म्हणाले की, कोणत्याही गोष्टीला गृहीत धरू नका. जे काम केले त्याचे श्रेयही घेतले जात आहे. जे काम नाही केले त्याचेही श्रेय घेतले जात आहे. त्यामूळे बुथ कमिट्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक घरात सत्याच्या आधारे जनजागृती करा. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रणनीती आखावी. आपला उमेदवार निवडून येईल याची संपूर्ण खबरदारी घ्यावी.


सत्यजित पाटलांना शाहूवाडीतून लीड मिळेल 


त्यांनी सांगितले की, सत्यजीत आबा आपल्या परिचयाचे आहेत. त्यांच्या वडिलांनी शाहूवाडी मतदारसंघात आमदार म्हणून खुप काम केले आहे. त्यामुळे सत्यजित आबांना उमेदवारी जाहीर होतच शाहूवाडीतून एकच जल्लोष झाला आणि मला विश्वास आहे. त्यांना शाहूवाडीतून मोठं लीड मिळेल. 


भाजपच्या काळात देशात प्रचंड महागाई वाढली आहे. जीएसटीच्या नावाखाली टॅक्सचा प्रचंड भडीमार केला आहे. निवडणुका आहेत म्हणून जीएसटी वाढवला नाही. निवडणुका झाल्या की जीएसटी 20 टक्के जाईल का अशी शंका आहे. कारण केंद्र सरकारने जे कर्ज काढले आहे ते फेडायचे आहे. सध्या इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दा फार गंभीर आणि लक्षवेधी आहे. या इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून भाजपने सर्वात जास्त पैसे जमा केले. उद्योगपती, कंपन्या यांना दम देऊन पैसे जमा केले गेले. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोरोनाच्या काळात आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत द्या असे आवाहन करत होतो. मात्र हे लोकं पीएम केअरला मदत करण्याचे आवाहन करत खासगी ट्रस्टकडे पैसे वळवत होते. इतकी घोर फसवणूक केली गेल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या