Sangli Gram Panchayat Election : गावच्या विकासासाठी परदेशातील उच्च शिक्षण सोडून एक तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखड्यात उतरली आहे. यशोधरा राजे शिंदे असे या अवघ्या 21 वर्षीय तरुणीचे नाव असून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील वड्डीत सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सध्या ती आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे यशोधरा राजे शिंदे ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यशोधरा ही एक उच्चशिक्षित तरुणी असून गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी थेट परदेशातून शिक्षण अर्ध्यावर सोडून परतली आहे. यशोधराचे जॉर्जिया या ठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण सुरू आहे. मात्र, यशोधरा ही शिक्षण सोडून थेट गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरली आहे.


ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निमित्ताने सरपंचपदासाठी यशोधराने उमेदवारी दाखल करत प्रचार सुरू केला आहे. गावखेड्यातील आजची तरुण पिढी नोकरी, शिक्षण व्यवसायाच्या निमित्ताने पुढे शहरात आणि परदेशात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असताना परदेशातील उच्च शिक्षण सोडून गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन परतलेली यशोधरा ही नव्या पिढीला राजकारणात येण्यासाठी आदर्श ठरत आहेत.


गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री देखील राजकारणाच्या आखाड्यात


दुसरीकडे विधानपरिषदेतील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे पडळकर यांचे मूळ गाव असून गावातील बहुतांश नागरिकांनी गावच्या बैठकीत हिराबाई पडळकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्याचा चंग देखील बांधला आहे. 


447 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर 


सांगली जिल्ह्यात 669 ग्रामपंचायती असून यापैकी ४४७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील निम्म्या गावांत ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. थेट सरपंच निवड होणार असल्याने गाव पातळीवरही राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नेते मंडळी मैदानात आहेत. थेट सरपंच निवडीतही वर्चस्व राहावे यासाठी संभाव्य उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे. दरम्यान, पाच गावांतील निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे, तर 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे सध्या 412 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातील 60 मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या