Sangli News : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यामधील खरशिंगमध्ये द्राक्ष उत्पादक (Grape) शेतकऱ्याची दोन एकर द्राक्ष बाग जोरदार वाऱ्यामुळे कोसळली. महादेव रंगराव जगताप असे या द्राक्ष बाग मालकाचे नाव असून यात जगताप यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वाऱ्याने बागेच्या आत शिरकाव केला आणि बघता बघता बाग खाली कोसळली. 


काही दिवसांतच द्राक्षे निर्यात करण्यात येणारी बाग कोसळल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. कवठेमहांकाळ तालुक्यात बनेवाडी गावात महादेव रंगराव जगताप या शेतकऱ्याची खरशिंग हद्दीमध्ये दोन एकर क्षेत्र द्राक्ष बाग होती. आठ दहा दिवसांत द्राक्ष बाग सुरु होणार होती. अतिशय परिश्रम घेऊन जगताप यांनी यावर्षी चांगली बाग आणली होती. सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वाऱ्याने बागेच्या आत शिरकाव केला आणि डोळ्यादेखत एका झपाट्यात बाग भूईसपाट झाली.


महादेव जगताप यांचं कुटुंब संकटात


बाग कोसळल्याने शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. कोसळलेली द्राक्ष बाग पाहून शेतकरी रडू लागले. बोलता सुद्धा येत नव्हते. यामध्ये पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महादेव जगताप यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट घोंगावत आहे. त्यांनी सोसायटीतून पाच-सहा लाख रुपये तसेच बँकेतून सात लाख रुपये असे कर्ज काढून द्राक्ष बाग लावली होती. सलग दोन वर्षे त्यांना द्राक्ष उत्पादन कमी आले होते, पण यावर्षी त्यांनी बागेकडे चांगले लक्ष दिले होतं. द्राक्षेही बरी होती. अत्यंत गरिबीतून कष्ट करून कर्ज काढून या शेतकऱ्याने एखाद्या मुलाप्रमाणे त्या बागेला सांभाळले होते.


सांगलीत आठ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागातून बेदाणे निर्मिती


दुसरीकडे सांगली जिल्ह्यात सुमारे 21,000 एकर क्षेत्रातील द्राक्ष देशांतर्गत बाजारपेठेत जातात. जिल्ह्यातील सुमारे आठ लाख 40 हजार टन द्राक्ष देशांतर्गत बाजारपेठेत जात असल्याने या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 3 हजार 150 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. याशिवाय सांगली जिल्ह्यातील सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागातून बेदाणे निर्मिती केली जाते. जिल्ह्यातील सुमारे 80 हजार टन इतक्या बेदाण्याची निर्मिती होते. हा बेदाणा देशासह देशाबाहेरील बाजारपेठांमध्ये विकला जातो. बेदाणे विक्रीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 1200 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न मिळते.


Sangli : जोरदार वाऱ्यामुळे 2 एकर द्राक्ष बाग कोसळली,मोठे नुकसान



इतर महत्वाच्या बातम्या