सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोक सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांच्या कानशिलात लगावली. तसेच सरकारी कागदपत्रे बोगस लोकांच्या हातात दिल्याने बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीलाही माने यांनी थोबाडीत लगावली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तासगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबतची कोणतीही नोंद झाली नव्हती.


इशारा देऊनही सुधारणा नाही


प्रदीप माने यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयास अचानक भेट दिली होती. त्यावेळी कार्यालयातील 70 टक्के खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. कोण कुठं गेलं आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. लोक मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पाहत उभे होते. त्यांना कोणीही व्यवस्थित माहिती देत नव्हते. या कार्यालयाचे प्रमुख वाय. सी. कांबळे हेही गैरहजर होते. हा प्रकार पाहून माने चांगलेच संतापले होते. या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.  


प्रमुख वाय. सी. कांबळे सुद्धा गैरहजर


दरम्यान, सेनेच्या इशाऱ्यानंतरही या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. त्यामुळे आज पुन्हा प्रदीप माने यांनी या कार्यालयाला अचानक भेट दिली. कार्यालय प्रमुख वाय. सी. कांबळे गैरहजर होते. ते कुठे गेले आहेत, याबाबत कोणाकडेही माहिती नव्हती. हालचाल रजिस्टर मागितले असता ते नसल्याचे सांगण्यात आले. याचवेळी बाळू लोखंडे हा बोगस व्यक्ती कार्यालयातील मूळ नकाशे घेऊन त्यावरुन दुसरा नकाशा तयार करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून माने चांगलेच संतापले. शासकीय कागदपत्रे, मूळ नकाशे बोगस व्यक्तीच्या हातात दिल्याने संतापलेल्या माने यांनी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांना धारेवर धरले. लोखंडे याने केलेल्या नकाशावर आपणच सह्या करत असल्याचे शिरढोणे यांनी कबूल केले. हा प्रकार पाहून माने यांनी शिरढोणे यांच्या कानाखाली लगावली. तर मूळ नकाशे लोखंडे सारख्या बोगस व्यक्तीच्या ताब्यात देणाऱ्या अन्य एकालाही कानशिलात लगावली. यापुढे या कार्यालयात एक जरी बोगस व्यक्ती दिसला तर याद राखा, असा दम यावेळी माने यांनी दिला. सोमवारी पुन्हा या कार्यालयात येऊन कार्यालय प्रमुख कांबळे यांना जाब विचारणार असल्याचे माने यांनी सांगितले.


तासगाव दत्त माळावरील प्रशासकीय इमारतीत भूमी अभिलेख कार्यालय आहे. या कार्यालयातून मोजणी, नकाशे, जुने सातबारा, नोंदी यासह अन्य कामे होतात. मात्र, या कार्यालयात एकही अधिकारी वेळेवर उपस्थित नसतो. अनेकवेळा टेबल मोकळे पडलेले असतात. सामान्य नागरिकांना एका कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी लोकांची दाद घेत नाहीत. त्यामुळे सामान्य लोक या कार्यालयाच्या बेधुंद कारभाराला वैतागले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदीप माने यांनी या कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या