Jayant Patil and Vishal Patil : सांगली जिल्ह्यामधील कडेगावमधील पतंगराव कदम यांच्या स्मारक लोकार्पण सोहळा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.  दरम्यान, स्मारक लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या व्यासपीठावर जवळपास 30 मिनिटे रंगलेल्या गप्पा सुद्धा चर्चेचा विषय झाला. सांगलीच्या दोन पाटील घराण्यातील राजकीय वाद आणि कुरघोडी अवघ्या जिल्ह्यासह महाराष्ट्राला सुद्धा परिचित आहे. मात्र, पतंगराव कदम यांच्या स्मारक लोकार्पण कार्यक्रमात दोन्ही नेत्यांना शेजारीच खूर्ची मिळाल्याने चांगल्याच गप्पा मारल्या. 






कार्यक्रमामध्ये जयंत पाटील अन् खासदार विशाल पाटील एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसून आले. यावेळी दोघांमध्ये बराच काळ गप्पा रंगल्या. दोघांमध्ये रंगलेल्या मनसोक्त गप्पा हा कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चेचा विषय बनला. लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या भूमिकेवरुन काँग्रेसमध्ये चांगलाच संशयकल्लोळ झाला होता. विशाल पाटील यांनी नेहमीच जयंत पाटील यांच्याबाबत सावध प्रतिक्रिया दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर कडेगावमधील काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात दोघेही नेते एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी व्यासपीठावर राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले तेव्हा सुद्धा उभय नेत्यांमध्ये गप्पांचा फड सुरु होता. 


त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच खासदार विशाल पाटील आणि जयंत पाटील सांगली जिल्ह्यात प्रथमच एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली असेल, याची चर्चा रंगली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या