Balasaheb Thorat : काँग्रेस पक्षासाठी अडचणीचा काळ आहे, पण अडचणीचा काळ येत असतो आणि जात असतो. या अडचणीच्या काळातच तावून-सुलाखून नेतृत्व तयार होत असते, असे सूचक वक्तव्य करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विश्वजित कदम यांना वडिलकीचा सल्ला दिला. गेल्या काही दिवसांपासून विश्वजित कदम भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी बोलताना विश्वजित कदम यांचे कौतुक करतानाच वडिलकीचा सल्ला दिला.
पलूस तालुक्यातील अंकलखोपमधील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यास बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम उपस्थित होते. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांच्याही भाजप प्रवेशावरून व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत सुरु असलेल्या चर्चेवरून भाष्य केले.
विश्वजित कदम यांचे कौतुक आणि सल्ला
थोरात म्हणाले की, पतंगराव कदम गेल्यानंतर विश्वजित कदम यांना सांभाळून घ्यावे लागेल असे वाटत होतं. मात्र, आता विश्वजितच सगळ्यांना सांभाळत आहे. काँग्रेसचा विचार, नेतृत्व पुढे घेऊन नेण्याची जबाबदारी आता विश्वजितवर आहे. विश्वजित कदम यांचा भविष्यकाळ काँग्रेसमध्ये घडेल. तो दुसरीकडे कोठेही घडणार नाही.
भाजपात गेलेल्याची थप्पी लागली आहे. काहीजण तिकडची सत्ता आली म्हणून तिकडे गेले. नंतर पक्षाच्या मिटींगमध्ये ती लोक मागच्या ओळीत मोबाईलमध्ये पाहत खाली मान घालून बसलेली दिसतात, असा टोलाही थोरात यांनी लगावला.
अशोक चव्हाणांच्या भेटीवर थोरात काय म्हणाले?
थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण गणपती निमित्त एका मित्राकडे गेले होते. त्या मित्राच्या घरी दारातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. आणि मीडियाने लगेच वेगळ्या बातम्या देऊन टाकल्या. या बातम्यांनी एखाद्याचा कार्यक्रम होऊन जातो.
इतर महत्वाच्या बातम्या