सांगली : शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) हा शक्ती वाढविणार आहे की शक्ती काढून घेणार आहे हेच कळत नाही. आपल्या सर्व संकटावर मात करण्यासाठी परमेश्वर असतो. परमेश्वराच्या नावावर कोण नांगर फिरवायचं काम करत असेल तर त्यांना देव देखील माफ करणार नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटाला घरचा आहेर दिला. शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरु आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 


देवाच्या नावावर जर काढून घेतली जात असेल तर ते योग्य नाही


धैर्यशील माने म्हणाले की, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कमी जमिनी आणि उताराच्या जमिनी आहेत. तरुणाकडे नोकऱ्या नाहीत. आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये जेवढी जमीन शिल्लक राहिली आहे. ती देखील देवाच्या नावावर जर काढून घेतली जात असेल तर ते योग्य नाही, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहे. 


धैर्यशील मानेंचा घरचा आहेर


माने यांनी  शक्तीपीठाच्या नावाखाली सरकारकडून नवा घाट घातला जात असल्याचे म्हणत महायुती सरकारला घरचा आहेर दिला. नागपूरपासून ते नृसिंहवाडीपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे. नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज नाही. देशात नव्याने राम मंदिर बांधण्यात आले. परंतु या मंदिरासाठी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग करण्याची गरज आहे का? तसेच आमच्या देवस्थानाकडे येण्यासाठी महामार्ग नव्याने करण्याची गरज नाही.


शासनाचा विरोध पत्करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू


आमच्या देवाधर्माकडे जाण्यासाठी यापूर्वीच रस्ते आहेत. मी आणि खासदार विशाल पाटील आम्ही दोघेही तरुण खासदार असून दोघेही या शक्तीपीठ महामार्गात विरोधात लोकसभेत आवाज उठवू. आम्ही शासनाच्या बाजूला आहोत. परंतु, जेव्हा शेतकऱ्यांचा विषय येईल तेव्हा आम्ही शासनाचा विरोध पत्करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू. असे सांगत धैर्यशील माने यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी घाट घातलेल्या महायुती सरकारवर टीका केली.


हजारो शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून शेतकरी जोरदार विरोध करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर शेतकरी पुन्हा आक्रोश करत आहेत. मुख्यमंत्री 25 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने हजारो शेतकरी मोर्चाने जाब विचारणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून या महामार्गाला विरोध सुरु आहे.


इतर महत्वाच्या बातम्या