Sangli news: सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरज तालुक्यातील बेडगमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारली जात असलेल्या स्वागत कमानीचे खांब ग्रामपंचायतने पाडल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर गाव सोडून मुंबईकडे प्रस्थान केलेल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. सरकारी खर्चातून कमान बांधून देऊ तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना दिले. यामध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.
पालकमंत्री सुरेश खाडे बैठकीत आल्यानंतर 'त्यांच्यासोबत आम्ही बैठकीत बसणार नाही असा आंदोलकांनी पावित्रा घेतला. यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे बैठकीतून उठून बाहेर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. दुसरीकडे, संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रत मिळाल्याशिवाय लाँग मार्च थांबणार नसल्याचा डॉ. महेशकुमार कांबळे यांनी पवित्रा घेतला आहे. दरम्यान, आता गावात कमान 'शासनातर्फे उभारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्याचे डॉ. महेशकुमार कांबळे यांनी सांगितले. स्वागत कमानीचे खांब ग्रामपंचायतीने पाडल्याच्या निषेधार्थ बेडग येथील दलित समाज बांधव तीन दिवसांपूर्वी गाव सोडून मंत्रालयात धडक मारण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. सुमारे दीडशे कुटुंबे भर पावसात लाँग मार्च करीत मुंबईच्या दशेने जात आहेत. दरम्यान या प्रश्नावर जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांनी मध्यस्थी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक घेतली.
यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमानीचे खांब पाडणाऱ्या ग्रामपंचायतीचे दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, त्याच ठिकाणी पुन्हा कमान उभारण्यात यावी, अशी मागणी केली. याबाबत प्रशासनातर्फे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.बैठकीत इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होऊन शासनातर्फे स्वागत कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
समाज माध्यमांवर अफवा पसरवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
दरम्यान, बेडग गावातील स्वागत कमान संदर्भात समाज माध्यमांवर कोणत्याही अफवा पसरवू नका. बेडगच्या ग्रामस्थांनी गावात सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितलेय या घटनेमुळे गावात कोणताही भेदभाव होऊ नये, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. सर्वांनी गावाच्या विकासासाठी पुन्हा एकत्र येणे अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी आपापसात सुसंवाद ठेवून कृती करावी. प्रशासनामार्फत सर्वांना सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.
बेडग गावातील स्वागत कमान अनुषंगाने समाज माध्यमावर कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये. दोन समाज बांधवांमध्ये तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी गावकऱ्यांनी घ्यावी. या संदर्भात समाज माध्यमातून चुकीचे संदेश देणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या