Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील शिराळा (Shirala) तालुक्याच्या पश्चिम भागातील पाच गावांत 23 ठिकाणी घरफोडी (Burglary) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदीसह इतर साहित्य असा लाखो रुपयांचा ऐवज लांबवला आहे. यातील 6 ते 7 चोरटे गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद देखील झाले आहेत. याबाबत कोकरुड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


घरफोडी झालेली कुटुंबे मुंबई, पुण्यासह इतर शहरात


शुक्रवारी (21 जुलै) पहाटेच्या सुमारास अंधार आणि मुसळधार पाऊस याचा फायदा घेत चोरट्यांनी बिळाशी येथील 14, मांगरुळ येथील 5, कोकरुड 2, बेलेवाडीत एक, अस्वलवाडीत एक अशी तब्बल 23 बंद घरे एका रात्रीत चोरट्यांनी फोडली आहेत. यामध्ये घरातील रोख रक्कम, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू आणि इतर साहित्य असा लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. घरफोडी झालेली अनेक कुटुंबे पुणे, मुंबईसह अन्य शहरांत असल्याने ते आल्यानंतरच चोरीस गेलेल्या ऐवजाची सर्व माहिती समजणार आहे.


स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून दरोडेखोरांचा शोध


चोरट्यांनी ऊस आणि अंधाराचा फायदा घेत एकाच रात्री पाच गावांत 23 ठिकाणी घरफोडीमुळे भीतीचे वातावरण आहे. चोरीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. या दरोड्याच्या  तपासासाठी सांगली  येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक देखील दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.  


दहा घरफोड्यासह 13 दुचाकी चोरीचा छडा, सराईत गुन्हेगाराकडून चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत 


दरम्यान सांगलीत महिनाभरापूर्वी 10 घरफोड्यांसह 13 दुचाकी गुन्ह्यांचा छडा लावण्यात आणि या चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आलं. संशयित चोरट्याकडून दुचाकी, दागिन्यांसह 13 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. संशयित हा कोल्हापूर जिल्ह्यातील असून तौफिक सिकंदर जमादार (वय 29, उमळवाड चर्चजवळ, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. आरोपीच्या सॅकमध्ये चांदीच्या मूर्ती व मुद्देमाल मिळून आला होता. सखोल चौकशी केली असता महात्मा गांधी पोलिस चौकीत संशयितावर घरफोडीचा, कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचंही समोर आलं. त्यानुसार तौफिक जमादार यास अटक करण्यात आली.


हेही वाचा


Sangli Crime: आटपाडीत शेअर मार्केटमध्ये दहा महिन्यात पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष; एक कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा