Sangli News: सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरज तालुक्यामधील बेडगमधील स्वागत कमानीवरून आंबेडकरी समाज आणि ग्रामपंचायत प्रशासन वादावर आज तोडगा निघतो का? याकडे लक्ष लागले आहे. बेडगमधून मुंबईत मंत्रालयाकडे निघालेल्या दलित समाज बांधवांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आहे. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडल्या प्रकरणी गाव सोडून दलित समाजाचे मंत्रालयाकडे लाँग मार्च सुरु आहे.
लाँग मार्चचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. महेशकुमार कांबळे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत मुंबईला पाच लोकांसोबत तातडीने येण्याचे निमंत्रण दिले आहे. भाजप नेते पृथ्वीराज बाबा देशमुख आणि जनसुराज्य पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांना दलित समाजाच्या लाँग मार्चबाबत माहिती दिली. त्यामुळे बेडगमधील निर्माण झालेल्या वादावर मुंबईतील बैठकीत तोडगा निघणार का? याकडे लक्ष आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने कमानीचे बांधकाम पाडण्यात आल्यानंतर आता सरपंच उमेश पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उमेश पाटील यांनी म्हटले आहे की, जानेवारी महिन्यात पहिल्या बैठकीत आम्ही सर्वसमावेश कमानीसाठी ठराव मंजूर केला होता. याबाबत आंबेडकरी समाजाशी बोलणं झालं होतं आणि त्यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर 24 मार्च 2023 रोजी झालेल्या ठरावात सर्वच महापुरुषांचे फोटो, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेडग ग्रामपंचायत बेडग अशी स्वागत कमान व्हावी असा ठराव मंजूर झाला.
मात्र, 16 एप्रिल 2018 चा शासन निर्णय आहे. त्यामध्ये कोणत्याही महापुरुषाची स्वागत कमान करायची असल्यास वैयक्तिक व्यक्ती आणि संस्थेला करता येणार नाही. ग्रामपंचायत किंवा शासन दरबारी ही स्वागत कमाल करता येईल. दोन्ही मीटिंगमध्ये त्यांना असा ठराव करून दिला होता, पण काही व्यक्तींनी वैयक्तिकपणे काम सुरू केलं. त्यामुळे 15 मे रोजी ग्रामपंचायतकडून बांधकाम न करण्यासाठी नोटीस दिली होती. त्यानंतरही काम सुरुच होते. कमानीसाठी चार अटी घालून दिल्या होत्या, त्या सुद्धा पूर्ण केलेल्या नाहीत, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, कसबे डिग्रज या ठिकाणी डॉ. भारत पाटणकर यांनी दलित समाजाची गुरुवारी भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून झालेल्या प्रकारांबाबत माहिती जाणून घेत, कमानीबाबत ग्रामसभेमध्ये जर हा निर्णय झाला असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नावर मंत्रालयाकडे निघालेल्या दलित समाजाचे प्रश्न स्थानिक पातळीवरच जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवायला हवे होते. याबाबत लवकर निर्णय व्हायला हवा, अन्यथा या लाँग मार्चमध्ये महाराष्ट्रातील पुरोगामी जनता उतरेल आणि हा एक व्यापक मार्च होईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या