सांगली : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. त्यावर आपण कुठेही जाणार नसल्याचं खुद्द जयंत पाटील यांनीच स्पष्ट केलं. त्यावरुनच भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मिश्किल टोला लगावला. जयंत पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या डोक्यात जे काय सुरू आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटत नाही असं ते म्हणाले. सांगलीत माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
जयंत पाटील यांच्या जवळचा एखादा पत्रकार जोडून द्या, म्हणजे मी त्यांना कानात विचारेन की त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे असे म्हणत भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल टोला लगावला.
विधीमंडळातील पास व्यवस्था बदलणार
विधिमंडळातील गदारोळानंतर विधिमंडळ प्रवेशाबाबत सरकारने कडक नियमावली बनवली असून डिसेंबरच्या अधिवेशनापासून फक्त आमदार आणि त्यांच्या पीए यांनाच विधिमंडळाचा प्रवेश मिळेल अशी व्यवस्था बनवली असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. एकूणच लोकसभा अधिवेशनाच्या धर्तीवर विधानसभा प्रवेश नियमावली बनवण्यात आल्याचं ते म्हणाले.
महापालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पण मी निवडणूक आयोग नाही, त्यामुळे मी बोलतोय ही शक्यताच आहे असेही पाटील म्हणाले.
शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
अखेर शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवली असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर असलेल्या जयंत पाटलांची जागा आता शशिकांत शिंदेंनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा एकप्रकारे विक्रमच केला. आता ते भाजपमध्ये जाणार की पवारांसोबतच राहणार, ही चर्चा सुरूच राहणार आहे. दुसरीकडे अतिशय कठीण काळात शशिकांत शिंदे यांच्यावर पदाची धुरा आली आहे. आव्हानांवर मात करत शिंदे पक्षाला नवी झळाळी देणार का हे पाहायचं आहे.
शरद पवारांसोबतच राहणार, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेले काही दिवस चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी राजीनामा दिला इथपासून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार इथपर्यंत सगळ्या शक्यतांनी धुमाकूळ घातला होता. एवढंच नाही तर सगळं ठरलंय फक्त खात्यावरुन अडलंय असंही सांगण्यात आलं. अखेर या सगळ्या चर्चांना विराम देण्यासाठी स्वत: जयंतराव माध्यमांसमोर आले. त्यांनी खास आपल्या शैलीत सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. आपण कुठेही जाणार नाही, शरद पवारांसोबत कायम राहणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
ही बातमी वाचा: