सांगली : महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Loksabha) संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मातोश्रीवरून मला उमेदवारीचा शब्द देण्यात आला आहे, त्यामुळे मी निवडणुकीच्या तयारीत असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे.


सभेमधून जे काय चित्र असेल ते स्पष्ट होईल


चंद्रहार पाटील म्हणाले की, मला उमेदवारी मिळाली, तर विशाल पाटील यांनी माझ्या माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाल्यास मी त्यांच्या मागे उभा राहीन, असेही चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले. उद्या (21 मार्च) सांगलीमधील मिरजेत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना चंद्रहार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्याच्या सभेमधून जे काय चित्र असेल ते स्पष्ट होईल मला उमेदवारी मिळेल, अशी आशा असल्याचे यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले. 


उद्धव ठाकरे उमेदवारीवर शिक्कोमोर्तब करणार?


दरम्यान, ठाकरेंची उद्या मिरजेमध्ये जाहीर सभा होत असून यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेत उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब करणार का? याची उत्सुकता आहे. चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर उमेदवारीचा शब्द आल्याने काँग्रेसमध्ये सन्नाटा पसरला आहे. काँग्रेसने सांगली जागेवर दावा करतानाच जागा आपलीच असल्याचे म्हटलं आहे. कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडून काँग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा आहे. ठाकरेंकडून उद्याच्या सभेत ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास सांगलीची लढत चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजय पाटील अशी होईल. संजय पाटील यांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 


टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ


दुसरीकडे, आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सांगलीत आज 600 गावे असून यामधील 10 टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का? कोणत्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही. टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ, परंतु ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे असे कदम यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या