सांगली : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सागंलीमध्ये (Sangli News) रविवारी 17 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आली आहे. मोर्चा शांततेत आणि लक्षवेधी होण्यााठी जिल्हाभर बैठका घेण्यात येत असून सोशल मीडियावरूनही जनजागृती करण्यात येत आहे. सांगलीमध्ये 2016 मध्ये काढण्यात आलेल्या मोर्चापेक्षाही हा मोर्चा अधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मराठा क्रांती मोर्चामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असणार आहे. शहरात विविध बैठकांसह आता गावामध्येही कार्यकर्ते एकत्र येत मोर्चात सहभागी होण्यासाठी नियोजन करत आहेत. भव्य दिव्य आणि संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरेल, असा मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्यात आल्यानंतर लगेचच मोर्चाची हाक देण्यात आली होती.
मोर्चाच्या एक दिवस आधी गावागावात जनजागृती रॅली
मोर्चा यशस्वी होण्यासाठी शनिवारी 16 सप्टेंबर रोजी गावागावातून जनजागृती रॅली काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावामध्ये सकाळी 9 ते 10 या वेळेत जनजागृती बाईक रॅली काढून मोर्चास येण्याबाबत जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांना आवाहन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
महिलांचा सहभाग लक्षणीय राहणार
दरम्यान, मोर्चा यशस्वी करण्यासाठी रणनीती सुरु असतानाच महिलांचा सक्रीय सहभाग असणार आहे. मोर्चा आघाडी सांभाळण्यासाठी नियोजन सुरु आहे. अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी उपनगरांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत.
सोशल मीडियातूनही मोर्चासाठी प्रचार
मोर्चा यशस्वी करण्यासाठी एका बाजूने बैठकांचा सिलसिला सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला सोशल मीडियातूनही वातावरण निर्मिती सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी लढाईसाठी प्रत्येकाने मोर्चात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनस्तरावरून उदासीनता दिसून येत असल्याने समाजामध्ये नाराजी वाढत चालली आहे. अंतरवाली सराठी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाला धार आली आहे.
कोल्हापुरात 2 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण
जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रणशिंग फुंकले असतानाच आता कोल्हापुरातूनही लढाईला बळ देण्यासाठी आमरण उपोषणाचा निर्णय सकल मराठा समाजाचा बैठकीत घेण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून अॅड. बाबा इंदूलकर आणि दिलीप देसाई छत्रपती शिवाजी चौकात 2 ऑक्टोबरपासून म्हणजेच गांधी जयंती दिवसापासून आमरण उपोषणास सुरुवात करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या