नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपकडून दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यमान पाच खासदारांची तिकीटं कापण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आला असून त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तथापि, प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. 


सांगलीतून संजय पाटलांनी बाजी मारली


दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सांगलीमधून भाजपचे उमेदवार कोण असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, संजय पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून भाजपने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे गेल्यास संजय पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी शड्डू ठोकला असला, तरी काँग्रेसने दावा आपला कायम ठेवला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे जाणार की ठाकरे गटाकडे जाणार? यावर संजय पाटील यांची निवडणुकीतील लढल अवलंबून असेल. दुसरीकडे, म्हाडामधून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा भाजपकडून संधी देण्यात आली आहे. 


पुण्यात मुरलीधर मोहोळ रिंगणात 


दरम्यान पुण्यामध्ये भाजपने भाकरी परतवत मुरलीधर मोहोळसारखा तरुण चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या ठिकाणी अनेक नावांची चर्चा सुरू असताना मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. नगरमध्ये अपेक्षितपणे पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला असून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबईमध्ये सुद्धा दोन उमेदवार बदलताना भाजपने मुंबई उत्तर मधून पियुष गोयल यांना लोकसभेच्या रिंगणात प्रथमच उतरवलं आहे. मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. जालनामधून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


20 जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित


दुसरीकडे, राज्यातील 20 जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, अकोला, वर्धा, नागपूर चंद्रपूर, नांदेड, जालना, दिंडोरी, भिवंडी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, म्हाडा आणि सांगली या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आलं असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना संधी देण्यात आली आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धुळ्यामधून डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीमधून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूरमधून सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या